महिलांचा सन्मान हा गावाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:01 IST2017-08-30T00:01:03+5:302017-08-30T00:01:19+5:30
स्त्री एक शक्ती आहे. ती अबला नाही तर सबला आहे. वेळोवेळी स्त्रियांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून समाजाला हे दाखवून दिले आहे.

महिलांचा सन्मान हा गावाचा सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : स्त्री एक शक्ती आहे. ती अबला नाही तर सबला आहे. वेळोवेळी स्त्रियांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून समाजाला हे दाखवून दिले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. प्रत्येक क्षेत्र स्त्रियांनी काबीज केले आहे. चूल व मूल या मर्यादेतून ती बाहेर पडली आहे. मात्र ग्रामीण भागात पाहिजे तो सन्मान स्त्रियांना मिळत नाही नसल्याचे चित्र पहायला मिळते, हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा मान-सन्मान दिला पाहिजे कारण महिलांचा सन्मान हा गावाचा सन्मान आहे, असे मत जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी व्यक्त केले.
(रायपूर) येथे दारुबंदी व महिला जागृती मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावररून बोलत होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बॅरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सागर काटेखाये, प्रमुख अतिथी म्हणून सरपंच कला बहेकार, उपसरपंच दुर्वास दोनोडे, तंमुस अध्यक्ष भरतराम चन्ने, पोलीस पाटील मोहनसिंह बघेल, सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथ दोनोडे, ग्रा.पं.सदस्य कस्तुरा ब्राम्हणकर, उषा बिसेन, मोहन बघेले, भिवराम मेश्राम, तेजूलाल हरिणखेडे, प्रेम कोरे, गुड्डू बिसेन, शिवकुमार राणे, जीवनलाल बहेकार उपस्थित होते.
माता शारदा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत गीत व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी सर्व महिलांनी गावात दारुबंदीची घोषणा केली. गावात काही विघ्नसंतोषी लोकांनी अवैध दारुविक्री सुरु केली होती. ते दुकान महिलांनी एकत्र येवून बंद पाडली. यात बचत गटाच्या महिलांचा मोठा वाटा आहे. पुढे गावात दारूपिणे, दारू विकणे यासारखे प्रकार घडल्यास दंड लावण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. प्राचार्य काटेखाये यांनी दारुमुळे होणारे नुकसान, स्त्रीभृण हत्या, बालविवाह, हुंडा पद्धती, कौटुंबिक हिंसाचार यावर मार्गदर्शन केले. संचालन दिव्या पटले तर आभार प्रिया पटले यांनी मानले. यशस्वितेसाठी लक्ष्मी महिला बचत गट, जयसेवा बचत गट, राणी दुर्गावती, दुर्गा, सहेली, आदर्श, ओम साई, लक्ष्मी, दत्त, कर्तव्य महिला गटांनीसहकार्य केले.