The highest temperature recorded in the season | हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद
हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

ठळक मुद्दे४४.४ अंश सेल्सिअस : मे महिन्यातील रेकार्ड मोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून मंगळवारी जिल्ह्यात ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान असून मे महिन्यातील आत्तापर्यंतच्या तापमानाचे रेकार्ड मोडले आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता.
हवामान विभागाने पुढील दोन आठवडे तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज जिल्ह्यात काही प्रमाणात खरा होत असल्याचे चित्र आहे. मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वर असल्याने जिल्ह्यावासीयांची चांगलीच होरपळ आहे. जणू सूर्य देवाने गोंदिया जिल्ह्यात मुक्काम ठोकला की असे चित्र होते. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर तापमानात घट झाली होती. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र मागील तीन चार दिवसांपासून पारा चढण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर मंगळवारी (दि.२१) या हंगामातील सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.हे तापमान आजरवचे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळपासूच तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे सर्वजण आज तापमान अधिक असल्याचे बोलते होते.
वाढत्या तापमानामुळे मंगळवारी दुपारी शहरातील रस्त्यांवर सुध्दा शुकशुकाट पाहयला मिळाला. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी अनेकांनी कुलर, पखें आणि एसीचा आधार घेतला होता. मात्र ४४.४ अंश सेल्सिअस तापमानात ते देखील काम करीत नसल्याने जिल्हावासीयांची चांगलीच होरपळ झाली होती. मात्र सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यात वाढ झाली होती.
कमी विद्युत दाबाने वीज पुरवठा
तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वच जण कुलर, पंखे, एसीचा आधार घेत आहेत. मात्र कमी विद्युत दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे ते देखील काम करीत नसल्याने नागरिकांची चांगलीच होरपळ आहे. कधी एकदा पावसाळा सुरु होतो आणि उकाड्यापासून दिलासा मिळतो अशी कामना जिल्हावासीय करीत आहे.


Web Title: The highest temperature recorded in the season
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.