बाजार लिलावात सर्वाधिक रक्कम
By Admin | Updated: March 24, 2017 01:35 IST2017-03-24T01:35:19+5:302017-03-24T01:35:19+5:30
सन २०१७-१८ या वर्षाकरीता देवरी नगरपंचायतला आठवडी बाजारातून प्रथमच १० लक्ष ७० हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे.

बाजार लिलावात सर्वाधिक रक्कम
सुविधांचा मात्र अभाव : नगरपंचायतला मिळणार १० लक्ष ७० हजारांचे उत्पन्न
देवरी : सन २०१७-१८ या वर्षाकरीता देवरी नगरपंचायतला आठवडी बाजारातून प्रथमच १० लक्ष ७० हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. ही रक्कम यापूर्वी मिळत असलेल्या उत्पन्नापेक्षा पाच पटींनी जास्त आहे. याकरीता लिलाव प्रक्रिया गुरूवारी (दि.२३) नगरपंचायतमध्ये पार पडली.
सर्वाधिक बोली बोलून आठवडी बाजार मिळविण्यात माजी सरपंच जैपाल शहारे यांनी हा लिलाव जिंकला. त्यामुळे आता आठवडी बाजाराची वसुली शहारे करतील. मागील ठेकेदारापासून दुकानदाराना होणारा त्रास बघता भाजी व्यवसायिक असलेले जैपाल शहारे यांनी बाजार मिळविला. याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला. मागील १५ दिवसापूर्वी न.पं.चे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी आठवडी बाजाराची पाहणी केली व दुकानदारांना सर्व बाबीची विचारपूस केली. त्यावेळी ठेकेदाराकडून जास्त रुपयांची वसुली व्यावसायीकांकडून होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे न.प.द्वारे नवीन शर्ती व अटी लावून आगामी वर्षाच्या बाजाराचा लिलाव करण्यात आला.
नगराच्या बाजारात अनेक समस्या आहेत. काही ठिकाणी ओटे बनविण्यात आले परंतु या ओट्यावर शेड नसल्याने दुकानदारांना ऊन व पावसाचा त्रास सहन करावा लागतो. दुकानदारांनी बऱ्याचदा सुविधा पुरविण्याबाबत अगोदर ग्रा.पं. व आताच्या नगरपंचायतला कळविले. परंतु त्यांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने आतातरी मुख्याधिकारी याकडे लक्ष देवून दुकानदारांना सुविधा प्रदान करणारा काय? असा सवाल केला जात आहे.
तालुक्याचा सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून देवरी बाजाराची ओळख आहे. राजनांदगाव (छ.ग.) गोंदिया, आमगाव, साकोली, भंडाराचे व्यापारी येत असतात. अतिक्रमणामुळे जागा जरी कमी शिल्लक असला तरी शेकडो लहान मोठी दुकाने लागत असतात. परंतु सुविधा मिळत नसल्याने व बाजारात ठेकेदाराला जास्त पैसे द्यावे लागत असल्याने व्यापारी नाराज आहे.
आतातरी सुविधा द्या!
यावर्षी नगरपंचायतला १० लक्ष रुपयांच्यावर उत्पन्न मिळत असले तरी या आठवडी बाजारात मुलभूत सुविधा आतातरी मिळणार काय? असा संतप्त प्रश्न केला जात आहे. पिण्याचे पाणी, शौचालय, रस्ते व वीज या प्रमुख सुविधा मिळत नसल्याने व्यापाऱ्यामध्ये नगर पंचायतविरूध्द असंतोष बघायला मिळतो. शौचालय व पिण्याच्या पाण्याची टाकी काही वर्षापूर्वी आठवडी बाजारात बांधण्यात आली. परंतु त्याला आतापर्यंत कुलूपच लावून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दुकानदारी सोडून व्यापाऱ्यांना इतरत्र दूर अंतरावर भटकावे लागते. याचा सर्वाधिक त्रास स्त्रीवर्गाला होत असतो.