सालेकसाच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती
By Admin | Updated: October 2, 2015 06:22 IST2015-10-02T06:22:36+5:302015-10-02T06:22:36+5:30
येत्या १ नोव्हेंबरला इतर नगर पंचायतींसोबत सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक घेण्याबाबत अधिसूचना काढण्यात

सालेकसाच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती
सालेकसा : येत्या १ नोव्हेंबरला इतर नगर पंचायतींसोबत सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक घेण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगनादेशामुळे आता सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक लांबणीवर गेली आहे.
या आदेशामुळे नगर पंचायतीत आम्हाला समाविष्ठ करा, अशी मागणी करणाऱ्या आमगाव खुर्दवासीयांना दिलासा मिळाला असून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे निवडणुकीच्या कामात लागलेल्या सालेकसा नगर पंचायतच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अचानक नैराश्य पसरले आहे. निवडणूक यंत्रणेची कामेही या आदेशाने ठप्प झाली आहेत. १ नोव्हेंबर २०१५ रोजी नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार होते. त्यासाठी ३० सप्टेंबर रोजी सर्व पाच तालुक्यात अधिसूचना काढण्यात आली. उमेदवारांचे नामनिर्देशीत अर्ज सादर करण्याचे असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु स्थगनादेश आल्याने त्यांचा हिरमोड झालेला दिसत आहे.(तालुका प्रतिनिधी)
स्थगिती का आली?
सालेकसा तालुक्याचे कामकाज सालेकसाच्या नावाने असले तरी येथील सर्व सरकारी कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठान मुख्य बाजारपेठा व बहुतांश परिसर आमगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या ग्रामपंचायतला लागुन सालेकसा ग्रामपंचायत परिसर आहे. परंतु प्रत्यक्षात सालेकसा नावाचे गाव या परिसरात नाही. सालेकसा ग्राम पंचायतमध्ये येणारे गाव हे शहराबाहेर खूप दूरवर जंगलापर्यंत पसरलेले व विखुरलेले आहेत. त्यामुळे नगर पंचायतीची वास्तविक हक्कदार आमगाव खुर्द ग्रामपंचायत होती. परंतु शासनाने नगर पंचायत निर्माण करताना परिसराचा विचार न करता ज्या नावाने तालुका मुख्यालय चालत आहे त्या ग्रामपंचायतीलाच नगर पंचायत बनविण्याचा निर्णय घेतला. यामुळे आमगाव खुर्दमध्ये राहणारे लोक व ग्रामपंचायत पदाधिकारी सुद्धा कमालीचे संतप्त झाले. त्यांनी अनेक वेळा शासनाशी पत्रव्यवहार करुन आमगाव खुर्दला नगर पंचायतीत समावेश करण्याची विनंती केली. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले. नाईलाजाने गावकरी ग्रामपंचायतीचा मदतीने कोर्टाचे दार ठोठावण्यासाठी गेले. तेथे त्यांना या निवडणुकीसाठी स्थगिती आणण्यात यश आले.