अरे ! कवठा पोलीस आलाय...
By Admin | Updated: December 17, 2015 01:51 IST2015-12-17T01:51:30+5:302015-12-17T01:51:30+5:30
लहान बालके हे खूप हट्टीपणा बाळगतात. शाळेत न जाणे, शिव्या देणे, नेहमी खेळणे, आई-वडील किंवा घरच्या मंडळीची न ऐकणे किंवा ...

अरे ! कवठा पोलीस आलाय...
पूर्व विदर्भातील हजार मुले सुधारली : ३० वर्षांपासून बालके सुधारण्याचा व्रत
मुन्ना नंदागवळी बाराभाटी
लहान बालके हे खूप हट्टीपणा बाळगतात. शाळेत न जाणे, शिव्या देणे, नेहमी खेळणे, आई-वडील किंवा घरच्या मंडळीची न ऐकणे किंवा अभ्यासाबद्दल असणारा दुरावा अशा अनेक कारणांमुळे पालकवर्ग त्रासून जातो. तेव्हा या बालकांवर एकच रामबाण उपाय असतो, तो म्हणजे कवठा पोलीस. या कवठा पोलिसाने मुलांच्या मनात घर केला आहे. अनेक बालके कवठा पोलीस आलाय म्हणून सगळीकडे चर्चा करतात.
कवठा पोलीस या नावाने ओळखला जाणारा व्यक्ती म्हणजे हरिचंद ढाडू मेश्राम (४९). ते कवठ्याचे रहिवासी असून त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. हरिचंद मेश्राम यांनी बालके सुधारण्याचा व्रत ३० वर्षांपूर्वीच घेतला असून त्याबाबत त्यांचे कार्य सुरू आहे. ते नेहमी सभ्यपणाने वागतात व पोलिसांच्या गणवेशात असतात. म्हणून बालकांपासून तर पालकांपर्यंत या हरिचंद्रला सगळीकडे कवठा पोलीस असेच संबोधिले जाते व त्यामुळेच हे नाव पडले. आतापर्यंत एक हजारापेक्षा अधिक मुले त्यांनी सुधारली आहेत. संपूर्ण पूर्व विदर्भाला भ्रमण केल्याचेही ते सांगतात. स्वत:च्या जीवनाचा कुठलाही विचार न करता त्यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून घेतले. त्यांनी मुले-मुली सुधारण्याचे कार्य हाती घेतले आहे.
हरिचंद्र मेश्राम ढिवर जातीचे असले तरी मात्र फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांनी प्रभावित आहेत. त्यांच्या विचारधारेने जसा समाज घडत गेला, तसेच बालके सुधारून घडवित आहेत. पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्हे या हरिचंदने अख्खा प्रवास फक्त सायकलने करून त्या परिसरातील, त्या गावातील मुलांना वळणावर आणले. मेश्राम यांचा रुबाबसुद्धा पोलिसासारखा दिसतो. म्हणून मुले पाहता क्षणीच कवठा पोलीस आलाय, असे म्हणत पळत सुटतात. असा न्यारा हरिचंद मेश्राम यांचा बाना आहे.
अनेक बालके दुरूस्त करुन मिळेल ती रोजी कमवून जगण्याच्या उंबरठ्यावर हिंमतीने बालके सुधारण्याचा व्रत ते पूर्ण करीत आहेत. या समाजसुधारकाचे संपूर्ण जीवन म्हणजे वयाच्या २० वर्षांपासून ते सदर काम करीत आहेत. तरीसुद्धा स्वत: संसाराच्या कल्पनेने भारावून जात नाही, याचीच खरी दाद द्यावी लागेल.
पाठीमागे कुणी नाही, कुणाचा आधार नाही, तरी मात्र हिंमत त्यांनी अजिबात सोडली नाही. अशा या समाजसुधारक मानसाला उदंड आयुष्य लाभो, असेच वाटते. कवठा पोलीस ऊर्फ हरिचंद मेश्राम यांनी आपल्या जीवनातील आतापर्यंतच्या अनेक दु:ख-सुखातील घडामोडींचे अनुभव लोकमतशी बोलताना सांगितले.