पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 01:21 IST2017-03-22T01:21:10+5:302017-03-22T01:21:10+5:30
आमगाव तालुक्याच्या कातुुर्ली येथे एका तरुण दाम्पत्यात झालेल्या भांडणात पतीने पत्नीेचा गळा आवळून खून केला.

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप
गोंदिया : आमगाव तालुक्याच्या कातुुर्ली येथे एका तरुण दाम्पत्यात झालेल्या भांडणात पतीने पत्नीेचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.२१) पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
राजकुमार भुरेलाल चौधरी (३०) रा. कातुर्ली असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी भूमेश्वरी उर्फ रंजिता राजकुमार चौधरी (२७) हिचा ६ मे २०११ च्या रात्री गळा दाबून खून केला होता.
भूमेश्वरीची प्रकृती बरी नसल्याने तिने उपचारासाठी औषधी आणण्यास नवऱ्याला म्हटले असता त्या दोघांचा वाद झाला. यात त्याने तिचा गळा दाबून खून केला. आमगाव पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
आमगाव येथील सहायक पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील यांनी प्रकरणाचा तपास केला होता. सरकारी वकील म्हणून सुरूवातीला अॅड.कैलाश खंडेलवाल व नंतर कृष्णा पारधी यांनी काम पाहिले.
प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणेकर यांनी याप्रकरणी आरोपीला जन्मठेप व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस निरीक्षक जयराज रनवरे यांच्या देखरेखीखाली सीएमएस सेलचे सहायक फौजदार राजकुमार कराडे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रंजिताचे वडील गोमाजी येळे रा. नोनीटोला यांना अखेर न्याय मिळाला. (तालुका प्रतिनिधी)