पाणी टंचाईवर मात करण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 00:55 IST2017-05-01T00:55:15+5:302017-05-01T00:55:15+5:30

तहसील कार्यालय तिरोडा व गोरेगाव तालुक्यांची जलयुक्त शिवार योजना आढावा बैठक घेण्यात आली.

Help overcome the scarcity of water | पाणी टंचाईवर मात करण्यास मदत

पाणी टंचाईवर मात करण्यास मदत

विजय रहांगडाले : जलयुक्त शिवार योजनेचे माध्यम
तिरोडा : तहसील कार्यालय तिरोडा व गोरेगाव तालुक्यांची जलयुक्त शिवार योजना आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये विधानसभा क्षेत्रातील २०१६-१७ वर्षातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला. यात जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होईल, असे मत आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले.
यात गोरेगाव तालुक्यातील कृषी विभाग, ल.पा., जि.प., पं.स., ग्रा.पं., लघु सिंचन, वनविभाग अंतर्गत एकूण ४१३ कामे घेण्यात आली होती. त्यात १६९ कामे पूर्ण झाली असून १३० कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित ११४ कामे लगेच सुरु होणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच सन २०१७-१८ अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील १० गावांचा समावेश करण्यात आला असून विविध यंत्रणेमार्फत ४८४ कामांकरिता आराखडा सादर करण्यात आला आहे. तसेच तिरोडा तालुक्यामध्ये सन २०१६-१७ मध्ये एकूण निवड झालेल्या ०९ गावांतील २३८ कामांपैकी १९५ कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर असून मे महिन्याअखेर पूर्ण होणार आहेत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रामुख्याने कृषी विभाग १३८ कामे, लपाजिप विभाग ३७ कामे, वनविभाग २३ कामे, लपा विभाग राज्यस्तर ६ कामे व पंचायत समिती ४ कामे याप्रमाणे विविध यंत्रणेचा समावेश असून प्रामुख्याने सिनाबा, भाखादू, जुने तलावातील गाळ काढणे, बोडी खोलीकरण, समतल सलगचर खोदणे, खोदतळे, सिमेंट नाल्यातील गाळ काढणे आदी कामे घेण्यात आली. सन २०१७-१८ अंतर्गत तिरोडा तालुक्यातील १० गावांचा समावेश करण्यात आला असून विविध यंत्रणेमार्फत १२४ कामांकरिता आराखडा सादर करण्यात आला आहे. निवड झालेल्या गावांमध्ये मे महिन्यापासून कामे सुरु होणार आहेत.
क्षेत्रात जलयुक्त शिवार योजनेमार्फत पाण्याची पातळी वाढली असली तरी नागरिकांनीसुध्दा याकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद देणे गरजेचे आहे. तसेच तापमानवाढीमुळे तालुक्यातील पाण्याचे साठे कमी होत असून पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ शकते. याकरिता सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश आमदारांनी दिले. तसेच पाणी टंचाईची भीषण समस्या उद्भवू नये याकरिता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व येणाऱ्या दिवसात पाणी साठवणीसाठी सहयोग करण्याचे जनतेस आ. रहांगडाले यांनी आवाहन केले.
आढावा बैठकीत प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, तालुका कृषी अधिकारी मंगश वावधने, उपकार्यकारी अभियंता अनंत जगताप, कृषी अधिकारी पोटदुखे, वनपरिक्षेत्राधिकारी विजय कदम, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, उपकार्यकारी अभियंता भांडारकर, पशिने व सर्व संबंधित यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Help overcome the scarcity of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.