ग्राहक चळवळीमुळे शोषणमुक्त समाज निर्मितीस मदत

By Admin | Updated: November 18, 2014 22:57 IST2014-11-18T22:57:51+5:302014-11-18T22:57:51+5:30

ग्राहक चळवळ ही सर्वस्पर्शीय चळवळ आहे. ग्राहक संरक्षण कायदा आणि माहितीचा अधिकारी कायद्यामुळे शोषणमुक्त समाज निर्मितीस मदत होईल, असे मत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे

Help in the creation of an exploitation free society due to the customer movement | ग्राहक चळवळीमुळे शोषणमुक्त समाज निर्मितीस मदत

ग्राहक चळवळीमुळे शोषणमुक्त समाज निर्मितीस मदत

सूर्यकांत गवळी : शासकीय कार्यालय प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन
गोंदिया : ग्राहक चळवळ ही सर्वस्पर्शीय चळवळ आहे. ग्राहक संरक्षण कायदा आणि माहितीचा अधिकारी कायद्यामुळे शोषणमुक्त समाज निर्मितीस मदत होईल, असे मत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सुर्यकांत गवळी यांनी व्यक्त केले.
मंगळवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित शासकीय कार्यालय प्रमुखांच्या सभेत गवळी मार्गदर्शन करीत होते. सभेला जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फुलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या सरचिटणीस स्मीता नॉर्टन, दिलीप भोसले, डी.के.आरीकर, डॉ. मिलींद येरणे, रिनायत भुवन प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्राहक ही मोठी शक्ती आहे असे सांगून गवळी म्हणाले, ग्राहक हा राजा आहे. तो संघटीत असला पाहिजे. त्याचे प्रबोधन होणे ही काळाची गरज आहे. ग्राहकांच्या संरक्षणासाठी त्यांना न्याय देण्यासाठी ग्राहक मंच आहे. ग्राहकांनी ग्राहक कायद्याचा वापर केला पाहिजे. तसेच दर महिन्याला ग्राहक मंचच्या बैठका झाल्या पाहिजे.
ग्राहकांच्या प्रबोधनासाठी दर महिन्याला वेगवेगळ्या कार्यक्रम, उत्सव व मेळाव्यातून ग्राहकांचे प्रबोधन करणारे प्रदर्शन भरविले पाहिजे. ग्राहक चळवळीचा महाराष्ट्र हा दिपस्तंभ असल्याचे सांगून श्री गवळी म्हणाले, प्रत्येक ग्राहकाने जागरूक असले पाहिजे. आपली फसवणूक होणार याची काळजी घेतली पाहिजे. जिल्हाधिकारी डॉ.सैनी म्हणाले, जागो ग्राहक जागो ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आली पाहिजे. आपली फसवणूक होणार नाही यासाठी प्रत्येक ग्राहक हा दक्ष असला पाहिजे. नमूद केलेले मुल्यच वस्तु, साहित्य विक्रेत्याला ग्राहकाने द्यावे असेही जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा पुरवठा अधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्राहकांना वेळेवर धान्य मिळावे यासाठी ग्रुप एसएमएसव्दारे गावातील नागरिकांना माहिती देण्यात येत असल्यामुळे धान्याच्या होणाऱ्या काळाबाजाराला आळा बसला आहे. ग्राहक संरक्षण परिषद जिल्ह्यात लवकरच गठीत करण्यात येत असल्याची माहिती काळे यांनी यावेळी दिली.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना गवळी यांनी ग्राहक प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहक म्हणून येणाऱ्या अडचणी अध्यक्ष गवळी यांना सांगितल्या. सभेला विविध विभागप्रमुख तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Help in the creation of an exploitation free society due to the customer movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.