गोंदिया : गोंदिया तालुक्यात जवळपास ३०० कोटी रुपये खर्चून रजेगाव-काटी सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला. मात्र, या प्रकल्पाचे बांधकाम करताना ते त्रुटीपूर्ण करण्यात आले. परिणामी, सिंचन प्रकल्पात पाणी साचून न राहता वाहून जाते. त्यामुळे या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना कसलाच लाभ होत नाही. डांगोर्ली बॅरेजची उंची २ मीटरने वाढविणे गरजचे असून, त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करून, तो त्वरित सादर करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील हे दोन दिवस गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. बैठकीला खा.प्रफुल्ल पटेल, आ.मनोहर चंद्रिकापूरे, माजी आ.राजेंद्र जैन, माजी खा.खुशाल बोपचे, माजी जि. प. अध्यक्ष विजय शिवणकर व सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी खा.प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया तालुक्यातील रजेगाव-काटी सिंचन योजना कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आली. मात्र, या योजनेच्या चुकीच्या बांधकामामुळे सिंचन निर्मिती होत नाही. त्यामुळे याच प्रकल्पातंर्गत येणाऱ्या तेढवा-शिवनी, देवरी-नवेगाव या उपसा सिंचन योजनाही नाममात्र ठरणार आहेत. या योजनेतील त्रुटी दूर अथवा डांगोर्ली बॅरेजची उंची २ मीटरने वाढवून किंवा बंधारे तयार करून शेतकऱ्यांना कसे पाणी उपलब्ध होईल, या दृष्टीने उपाययोजना करण्यास सांगितले. याचीच दखल घेत, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना या योजनेचा नीट अभ्यास करुन त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, निंबा सिंचन योजनेचे काम मागील १५ ते २० वर्षांपासून रखडले असल्याचा मुद्दा आ. मनोहर चंद्रिकापुरे आणि माजी आ.राजेंद्र जैन यांनी उपस्थित करून हे प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली. ना.जयंत पाटील यांनी या प्रकल्पातील अडचणी दूर करून ते मार्गी लावण्याचे निर्देश दिले. सालेकसा तालुक्यातील बेवारटोला सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.
......
धापेवडा टप्पा २ साठी १०० कोटी देणार
तिरोडा तालुक्यातील महत्त्वपूर्ण धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा २ चे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत येणारी कामे त्वरित मार्गी लावून शेतकऱ्यांना याचा कसा लवकर लाभ मिळेल, या दृष्टीने काम करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बैठकीत दिले.
.......
कलपाथरी, पिंडकेपार, कटंगी यांना आधी प्राध्यान्य द्या : प्रफुल्ल पटेल
धापेवडा सिंचन प्रकल्पाचे पाणी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून १५ तलावांमध्ये सोडण्याचे प्रस्तावित आहे, पण हे करण्यापूर्वी या प्रकल्पाचे पाणी कलपाथरी, पिंडकेपार, कंटगी या प्रकल्पांचा आधी विचार करावा. गोरेगाव आणि गोंदिया तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागून शेतकऱ्यांना मदत होऊ शकते, असे सांगितले. यावर ना.जयंत पाटील यांनी याचा आरखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.