Heavy water shortage at Bothalei | बोथली येथे भीषण पाणीटंचाई
बोथली येथे भीषण पाणीटंचाई

ठळक मुद्देशेतातील विहिरींचा आधार : नळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
खजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून गावकऱ्यांना पाण्यासाठी १ कि.मी.अंतरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या खजरी येथील शेतातील विहिरीचे पाणी आणून गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. तर पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यात स्थानिक प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
बोथली येथे धसांराम भोयर यांच्या घराजवळ विहीर असून त्यांच्या विहिरीत मारलेल्या बोअरच्या सहाय्याने पाणी काढून पाणी टॉकी भरुन पाणी वाटप केले जात आहे. मात्र मागील आठवडाभरापासून पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ झाली आहे. या गावात ९ बोअरवेल असून त्या सुध्दा कोरड्या पडल्या आहेत. एक सौर उर्जा प्रकल्प असून त्याव्दारे वॉर्डात पाणी वाटप केले जाते. टुनेश्वर मेश्राम यांच्या घराजवळील सौर उर्जा प्रकल्प बंद पडला आहे. गावात बेनीराम ठाकरे, ठाणेश्वर ठाकरे, केशोराव चव्हाण, कुंवरलाल मांदाळे यांच्या बोर गावात ३०० फुटापेक्षा जास्त खोदल्या आहेत. व त्या बोअरवेलमधून पाणी काढून उन्हाळी धानपिक काढल्या जात आहे. त्यामुळे परिसरातील सार्वजनिक विंधन विहिरी बंद कोरड्या पडल्या आहेत. गावात निर्माण झालेली पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता शेतीसाठी पाण्याचा उपसा न करण्याच्या सूचना शेतकºयांना देण्यात आल्या आहे. गावातील सार्वजनिक विहिरींनी सुध्दा तळ गाठला आहे तर नळ योजनेव्दारा सुध्दा दिवसातून केवळ एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून भटकंती करावी लागत आहे.

बोथली येथे मागील वर्षी सुद्धा पाण्याची समस्या होती. त्यात यावर्षी पुन्हा वाढ झाली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक खासगी बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आली आहे. टंचाईच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले होते. मात्र निधी दिला नाही त्यामुळे ग्रामपंचायतच्या १४ व्या वित्त आयोगाचा निधी द्यावा लागला.
- नरेश चव्हाण सरपंच, बोथली.
गावातील पाण्याची समस्या दूर करण्याकरिता शासन दरबारी पत्र व्यवहार केला. समस्या दूर केल्या जातील अशी वरिष्ठ अधिकाºयाकडून अपेक्षा.
- गिरीष भेलावे, ग्रामसेवक, बोथली


Web Title: Heavy water shortage at Bothalei
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.