सहा तालुक्यात अतिवृष्टी

By Admin | Updated: August 30, 2015 01:29 IST2015-08-30T01:29:29+5:302015-08-30T01:29:29+5:30

गेल्या तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी (दि.२८) रात्रीपासून दमदार हजेरी लावून जिल्हावासीयांना तृप्त करून टाकले.

Heavy rain in six talukas | सहा तालुक्यात अतिवृष्टी

सहा तालुक्यात अतिवृष्टी

रात्रभरात ९० मिमी : सर्वांना दिलासा, मात्र सखल भागात वस्त्या जलमय
गोंदिया : गेल्या तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी (दि.२८) रात्रीपासून दमदार हजेरी लावून जिल्हावासीयांना तृप्त करून टाकले. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८९.९० मिमी पाऊस बरसला. या दमदार पावसामुळे सहा तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. पावसाची वाट पाहात असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले तर सामान्य नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.
शनिवारी सायंकाळी पुन्हा आभाळ भरून येऊन पावसाला सुरूवात झाल्याने यावर्षीचा पावसाचा ‘बॅकलॉग’ भरून निघण्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी सायंकाळी रिपरिप बरसत असलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून जोर धरला. विजेच्या कडकडाटासह रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. सालेकसा तालुक्यात सर्वाधिक १३८ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली असून तिरोडा तालुक्यात ५१ मिमी. पाऊस बरसला आहे. या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव, देवरी, आमगाव व सालेकसा सहा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. तिरोडा व सडक-अर्जुनी तालुक्यावर मात्र पाऊस नाराज दिसून आला.
या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. मात्र कुठेही नुकसानीची माहिती मिळाली नाही. शिवाय रस्तेही बंद पडले नसल्याची माहिती आहे. परंतू गोंदिया शहरातील आणि जिल्ह्यातील काही सखल भागात पाणी साचल्याने घरांना पाण्याचा वेढा पडला. रस्तेही जलमय झाल्याने त्यातून मार्ग काढताना नागरिकांची अडचण झाली. रात्री विजेच्या कडकडाटासह बरसलेल्या पावसामुळे वीज पडल्याची शंका व्यक्त केली जात असली तरी वृत्त लिहेपर्यंत तसला प्रकार घडल्याबाबत माहिती मिळाली नव्हती. या वर्षातील हा सर्वात दमदार पाऊस असल्याची नोंद घेण्यात आली.
या पावसामुळे जिल्ह्यातील इटियाडोह धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पाण्याची पातळी २५०.३० मीटर झाली असून त्याची टक्केवारी २६.२१ आहे. पुजारीटोला धरणात ३१८.६५ मी. पातळी असून हे धरण ७७.१३ टक्के, सिरपूर धरणात ३४५.२१ मी. पातळी असून ३०.३ टक्के तर कालीसराड धरणात ३४२.४० मी. पातळी असून ५४.४४ टक्के भरले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Heavy rain in six talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.