आरोग्य सेवकांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: October 11, 2014 23:10 IST2014-10-11T23:10:25+5:302014-10-11T23:10:25+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांचे मागील सहा महिन्यांपासून पगार थकीत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना हाती पगार

आरोग्य सेवकांची दिवाळी अंधारात
कालीमाटी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांचे मागील सहा महिन्यांपासून पगार थकीत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना हाती पगार न आल्याने आरोग्य सेवकांची दिवाळी अंधारात दिसून येत आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील शेकडो आरोग्य सेवकांना महिने होऊनही वेतन मिळत नसल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. प्रा.आ. केंद्र कालीमाटी येथील आरोग्य सेवक ईश्वर उके तर बनगाव आरोग्य केंद्राचा आरोग्य सेवक नीलेश उके यांना एप्रिल महिन्यापासून पगार मिळालेला नाही. यामुळे या आरोग्य सेवकांवर कर्ज काढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या थकून असलेल्या पगारासाठी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे आपल्या पगारासाठी उके यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या चकरा मारत वेतनाबद्दल विचारणी केली असता अनुदान नसल्याने आरोग्य सेवकांचे पगार थकून असल्याचे कळले.
कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २६ गावांचा समावेश आहे. तसेच २२ ग्राम पंचायत असून येथील लोकसंख्या एकूण सुमारे ३७ हजार ३३८ आहे. एवढ्या मोठ्या संस्थेसाठी एका आरोग्य सेवकांवर रुग्ण सेवा अवलंबून आहे. येथील अनेक रिक्तपदांमुळे आरोग्य सेवक, आरोग्य सहायक, पर्यवेक्षक आदींचे कार्य एकट्या कर्मचाऱ्यावर येत आहे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. बहुतेकदा रात्री अपरात्री कामे करुन आजारी होण्याची पाळी या आरोग्य सेवकावर येत असल्याचे कळते. नुकतेच कट्टीपार येथील आरोग्य सेविका बांबळ यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आरोग्य सेवक, सेविका व इतर कर्मचारी हजारो रुग्णांची निगा राखतात. पण शासनाच्या व जि.प. दुर्लक्षतेमुळे त्यांच्यावर आजारी हाण्याची पाळी येत असल्याचे दिसून येत आहे. तरी आरोग्य सेवकांचे पगार त्वरीत काढण्यात यावे अशी मागणी आरोग्य सेवक ईश्वर उके व निलेश उके यांनी केली आहे.