आरोग्य सेवा सलाईनवर

By Admin | Updated: September 10, 2015 02:13 IST2015-09-10T02:13:59+5:302015-09-10T02:13:59+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा-जमी, कोसमतोंडी व परसोडी या तीन गावांतील आरोग्य विभागाचे उपकेंद्र आता कंत्राटी आरोग्य सेवीकेच्या हातात ....

Health service saline | आरोग्य सेवा सलाईनवर

आरोग्य सेवा सलाईनवर

रूग्णांची गैरसोय : कंत्राटी आरोग्य सेविका करते आरोग्य तपासणी
राजेश मुनीश्वर सडक-अर्जुनी
सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा-जमी, कोसमतोंडी व परसोडी या तीन गावांतील आरोग्य विभागाचे उपकेंद्र आता कंत्राटी आरोग्य सेवीकेच्या हातात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रूग्णांची गैरसोय होत असून तालुक्यातीलच आरोग्य सेवा सलाईनवर असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये, चार प्राथमिक आरोग्य केंद्र, बोपाबोडी, मंदीटोला व कोसमतोंडी या ठिकाणी आयुर्वेदिक दवाखाने असून २७ उपकेंदे्र आहेत. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून तालुक्यातील एक लाख सात हजार ४९९ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून तिडका व पांढरी याठिकाणी आरोग्य सेवक नसल्यामुळे तेथील आरोग्य सुविधा दुसऱ्यांच्या खांद्यावर ओझे देऊन आरोग्याचा भार सांभाळण्याचे काम होत आहे. तालुक्यातील कोकणा-जमी, परसोडी-सडक व कोसमतोंडी या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून कायमस्वरूपी आरोय सेविका नसल्यामुळे ११ महिन्यांच्या कंत्राटावर ठेवलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकेच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. परसोडी उपकेंद्रात वडेगाव, परसोडी, बौध्दनगर व कोदामेडी या चार गावांचा समावेश केला आहे. या चार गावांची लोकसंख्या पाच हजार ६२६ आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार, दोन हजार ५०० लोकसंख्येच्या गावांना एक उपकेंद्र देणे गरजेचे आहे. पण चुकीच्या धोरणामुळे ही चार गावे एकाच उपकेंद्रात समाविष्ट करून आरोग्याचे धिंडवडे काढले आहेत. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वडेगाव व कोदामेडी या दोन गावांचे एक उपकेंद्र, परसोडी व बौध्दनगर यांचे एक उपकेंद्र देऊन खऱ्या अर्थांने आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पण अधिकारी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवतील तेव्हाच काही होऊ शकेल.
तालुक्यातील सौंदड येथील ग्रामीण रुग्णालय म्हणजे ‘नाव सोनाबाई हाती कथलाचा वाडा’ अशी अवस्था आहे. दर्जा ग्रामीण रुग्णालयाचा दिला पण शासनाच्या नियमाप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरलेले नाहीत. लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पद भरण्याची गरज निर्माण झाली आहे.
येणाऱ्या काही महिन्यांत सडक-अर्जुनी येथे उपजिल्हा रुग्णालय होणार असल्याची कुणकुण सुरु असल्याची चर्चा आहे. उपजिल्हा झाल्यास तालुक्यातील कोणत्याही रुग्णांना गोंदिया, भंडारा, नागपूरला जाण्याची शक्यतो गरज भासणार नाही व बहुतेक औषधोपाचार येथेच होऊ शकतील.
अनेक पदे रिक्तच
तालुक्यातील तिडका व पांढरी या ठिकाणी पाच महिन्यांपासून आरोग्य सेवक नसल्यामुळे मलेरिया तपासणी, जलशुध्दीकरण व घरभेटी कार्य कशी होतात, ते त्यांनाच ठाऊक. सडक-अर्जुनी तालुक्यातील २७ उपकेंद्र्नांत राज्य शासनाचे आठ तर जिल्हा परिषद विभागाचे १७ आरोग्य सेवक आहेत. यापैकी जिल्हा परिषदेचे दोन आरोग्य सेवकांची पदे रिक्त आहेत. जनतेच्या आरोग्याची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Health service saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.