मुख्याध्यापकालाच ठाऊक नाही शिक्षण सभापती कोण?
By Admin | Updated: October 22, 2016 00:34 IST2016-10-22T00:34:58+5:302016-10-22T00:34:58+5:30
जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी इतर जि.प. पदाधिकाऱ्यांसह तिरोडा तालुक्यातील पिपरीया जि.प. वरिष्ठ शाळेला भेट दिली.

मुख्याध्यापकालाच ठाऊक नाही शिक्षण सभापती कोण?
पिपरीया शाळेतील प्रकार : जि.प. शाळेवरील शिक्षकांचे असेही सामान्य ज्ञान
परसवाडा : जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी इतर जि.प. पदाधिकाऱ्यांसह तिरोडा तालुक्यातील पिपरीया जि.प. वरिष्ठ शाळेला भेट दिली. दरम्यान मुख्याध्यापकांना जि.प.चे शिक्षण सभापती कोण? अशी विचारणा केली. मात्र अर्धातासपर्यंत ते मुख्याध्यापक शिक्षण सभापती कोण? हे सांगू शकले नाही. त्यामुळे सदर शाळेच्या शैक्षणिक कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तिरोडा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पिपरीया येथे जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे तसेच माजी जि.प. सदस्य डॉ. योगेंद्र भगत, रमेश पटले, राधेलाल पटले व हुपराज जमईवार यांनी भेट दिली. सर्वप्रथम जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी अंगणवाडीला भेट दिली. त्यावेळी अंगणवाडीत संपूर्ण दुरवस्था दिसून आली. फलकावर जुन्याच पदाधिकारी, अधिकाऱ्यांची नावे होती. अंगणवाडी सेविका सीमा शुक्ला यांचे कार्य असमाधानकारक असल्याचे दिसून आले. यानंतर लगेच शौचालयाची पाहणी करण्यात आली. शौचालय पूर्णत: मोडकळीस आलेले असून केरकचरा भरलेले आढळले.
यानंतर कार्यालयात गेल्यावर खुर्चीवर धूळ पसरलेली आढळली. जि.प. अध्यक्षांनी स्वत:च्या हातांनी धुळ स्वच्छ केले. माहिती फलक बघितले असता त्यात जुन्या पदाधिकाऱ्यांची नावे असल्याने उच्चश्रेणी मुख्याध्यापक डी.पी. नागपुरे यांना जि.प.चे शिक्षण सभापती कोण? अशी विचारणा करण्यात आली. मात्र मुख्याध्यापक नागपुरे उत्तर देवू शकले नाही. अर्ध्या तासपर्यंत जि.प.अध्यक्ष उषा मेंढे व स्वत: शिक्षण सभापती पी.जी. कटरे सदर प्रश्न विचारत असूनही मुख्याध्यापक योग्य उत्तर देण्यास असमर्थ ठरले. मुख्याध्यापकाला शिक्षण सभापती बाबत काहीही माहितीच नव्हती. यानंतर जमईवार यांनी गमतीने बारीक आवाजात सावंत असू शकतात असे बोलले. यावर अर्ध्या तासानंतर मुख्याध्यापक नागपुरे यांनी सावंत शिक्षण सभापती असल्याचे हास्यस्पद उत्तर जि.प.अध्यक्ष मेंढे व शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांना सांगितले. यावर मुख्याध्यापक किती हुशार व तरबेज आहेत, ते विद्यार्थ्यांना काय शिकवित असतील? असा प्रश्न उपस्थित पदाधिकारी व पालकांना पडला.
मुख्याध्यापक दररोज शाळेत उशिरा येतात. मिटिंगच्या नावावर साडेबारा वाजता निघून जातात तसेच परसवाडा येथील पानटपरीवर बसून राहता अशी तक्रार पालकांनी केली. परंतु केंद्र प्रमुख खोब्रागडे यांनी कधीही मुख्याध्यापकावर कारवाई केली नाही. साटेलोटे घेवून प्रकरण दाबण्यात आले. केंद्रप्रमुख यांनी व्हीजीट पुस्तकात तसे नमूद केले पण कार्यवाही केली नाही. तसेच वरिष्ठांनाही कळविले नाही. अशा मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी जि.प.अध्यक्ष मेंढे व शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांच्याकडे केली. सदर पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक कसे आहेत हे स्वत:च बिघतले आहे. (वार्ताहर)