स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST2021-04-06T04:28:16+5:302021-04-06T04:28:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील केशोरी ते वडगाव व खोडदा हा मार्ग गेल्या १० वर्षात खड्डेमय झाला ...

स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवले
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील केशोरी ते वडगाव व खोडदा हा मार्ग गेल्या १० वर्षात खड्डेमय झाला होता व त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाने नेहमी दुर्लक्षच केले. अशात केशोरी येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम धामट यांनी स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकून संपूर्ण खड्डे बुजवले.
सरकारे बदलली मात्र या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत गेली. त्यामुळे या रस्त्याची पुरती वाट लागली होती. परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागायची. पावसाळ्यात तर या रस्त्याने प्रवास म्हणजे जणू यमलोकीची यात्रा करणेच ठरत होते. या क्षेत्राला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार लाभले आहेत व त्यांच्याकडे वारंवार रस्ता दुरूस्तीची मागणी करण्यात आली. मात्र, या कामासाठी निधी खेचून आणण्यात आमदार कमी पडले.
सोबतच त्यांना निवडून देणाऱ्या मित्रपक्षातील कार्यकर्त्यांनाही जनतेचा विसर पडल्याचा आरोप होत आहे. अखेर तालुका काॅंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष धामट यांनी जनतेच्या सोईसाठी स्वखर्चातून या रस्त्यावर मुरूम टाकून त्याची डागडुजी केली. धामट यांच्या दातृत्वामुळे परिसरातील जनतेला खड्डेमय रस्त्यापासून मुक्ती मिळाली. परिसरातील नागरिकांनी धामट यांचे आभार मानले आहेत.