आधी हिशेब, नंतर ग्रामसभा
By Admin | Updated: January 29, 2016 04:40 IST2016-01-29T04:40:16+5:302016-01-29T04:40:16+5:30
प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तालुक्यातील

आधी हिशेब, नंतर ग्रामसभा
सडक अर्जुनी : प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तालुक्यातील वडेगाव (सडक) येथील गावकऱ्यांनी आधी हिशेब द्या, नंतर ग्रामसभा घ्या, असा पवित्रा घेत ग्रामपंचायतच्या आलमारीला कुलूप लावून आपला रोष व्यक्त केला.
गेल्या सात वर्षापासून वडेगाव येथे ग्रामसेवक सुभाष सिरसाम हे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळातील कामांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी २६ जानेवारीला सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच घनश्याम मेंढे यांची एकमताने निवड करण्यात आली. गावकऱ्यांचा रोष पाहता ग्रामसभेच्यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
या ग्रामसभेची पूर्वसूचना पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी झामसिंग टेंभरे व पंचायत विभागाचे नेताजी धारगावे, शरद झामरे तसेच कृषी विभागाचे सुरेंद्र धमगाये यांना दिल्याने ते ग्रामसभेला उपस्थित होते. यावेळी खंडविकास अधिकारी टेंभरे यांनी गावाच्या विकासाच्या योजनांबद्दल माहिती सांगितली. कृषी विस्तार अधिकारी धामगाये यांनी विविध योजनांची माहिती ही गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे ग्रामसभेत रोष व्यक्त होत असल्याचे सांगितले.
ग्रामस्वच्छता अभियानाच्या तीन लाखांच्या बक्षीसाचा हिशेब न दिल्यामुळे या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा दाट संशय गावकऱ्यांना आला. त्यामुळे आधी हिशेब द्या, नंतर ग्रामसभा घ्या, असा पवित्रा घेवून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष ग्रामपंचायतच्या आलमारीला कुलूप ठोकून गावकऱ्यांच्या व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या समक्ष निष्पक्ष चौकशी करण्याचे ग्रामसेवक सिरसाम व पंचायतचे विस्तार अधिकारी नेताजी धारगाये यांनी लेखी लिहून दिले.
यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य राधिका हुकरे, शोभा खोब्रागडे, सुषमा ब्राम्हणकर, यशोधरा मुनीश्वर, भावराव मेंढे, उपसरपंच राजेंद्र खोटेले आदी व गावकरी बाबुराव हुकरे, घनशाम मेंढे, देवचंद खोब्रागडे, प्रदीप मुनीश्वर, तुळसीराम मुनीश्वर, अनंतरकुमार मुनीश्वर, अशोक सूर्यवंशी, राजेश सूर्यवंशी, केशोराव तरोणे, प्रभाकर भेंडारकर, दशरथ भोरजारे, चैतराम, खोटेले, जीवन मुनीश्वर, कंठी ब्राम्हणकर, योगराज हुकरे, राजेश मुनीश्वर, राजेंद्र हुकरे, सुनील मुनिश्वर, हरिंचंद्र मुनिश्वर, चोपराम मेंढे यांच्यासह शेकडो लोक उपस्थित होते. चौकशीअंती ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाही करण्याची मागणीही गावकऱ्यांनी एकमताने केली आहे. (शहर प्रतिनिधी)
अन् आलमारीला ठोकले कुलूप
४ग्रामपंचायतच्या सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच व सचिव आपल्या मनमर्जीने कामे करतात व शासनाचा आलेला निधी कुठे खर्च केला याची साधी माहितीही सदस्यांना देत नाही, तेराव्या वित्त आयोगाची व सामान्य फंडाचा लेखाजोखा वेळोवेळी न दिल्यामुळे या समस्यांना घेवून सदस्य व गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या आलमारीला ‘कुलूप ठोको’ कार्यक्रम केला.