लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे राज्यातील सर्वच शाळा बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांच्या दारी भेटी देऊन समस्या सोडवित आहे. गोंदिया जिल्ह्यातील २९ हजार विद्यार्थ्यांच्या दारी गुरूजींनी जाऊन त्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन केले आहे.मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यंदा ऑगस्ट महिना येऊनही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या गृहभेटी करण्याचे पत्रकाढले होते. परंतु या पत्रावरून काही शिक्षक संघटनांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या गृहभेटी ह्या कोरोना पसरविण्यासाठी कारणीभूत असल्याची टिका केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यातील २ हजार १८५ शिक्षकांनी २८ हजार ६३४ विद्यार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या आहेत.६९७ शाळांनी लिंकमध्ये माहिती भरली असून त्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ६८ हजार २०६ आहे. परंतु यापैकी २८ हजार ६३४ विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षक पोहचले आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद वर्ग १ ते १० च्या अभ्यासक्रमावर आधारित क्लास घेत आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री ह्या वाहिणीवरून प्रसारीत होणाऱ्या टिली-मिली या कार्यक्रमातून २६ हजार ६६९ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात.जीओ टीव्हीच्या माध्यामातून ४ हजार ७९१ विद्यार्थी अभ्यास करतात. टिली-मिली या कार्यक्रमात वर्ग १ ते ३ री करीता १ तास, वर्ग ४ थी ते ६ वी पर्यंत २ तास, वर्ग ७ ते ८ वी करीता २ तास, वर्ग ९ ते १० करीता २ तास वेळ दिला जातो. सकाळी ८ ते १२ या काळात या कार्यक्रमातून विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. १८५१ शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत.
कोरोना विषाणूमुळे शाळा बंद असल्या तरी अनेक विद्यार्थी विविध माध्यमातून ज्ञानार्जन करीत आहेत. आपापल्या सोयीनुसार हे शिक्षण सुरू आहे. शिक्षक स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांच्या गृहभेटी करीत आहेत.विद्यार्थ्यांच्या गृहभेटींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी जि.प.गोंदिया.