गजबजू लागली गोंदियातली ‘चितारओळ’

By Admin | Updated: August 24, 2015 01:45 IST2015-08-24T01:45:49+5:302015-08-24T01:45:49+5:30

‘चितारओळ’ हे नाव कानी पडताच नागपुरातील मूर्तिकारांची वस्ती असलेली बोळ डोक्यात येते.

Gudiyatli 'Chitraol' | गजबजू लागली गोंदियातली ‘चितारओळ’

गजबजू लागली गोंदियातली ‘चितारओळ’

मूर्तिकारांनी मांडले बस्तान : मातीचा देव घडविण्यास झाली सुरुवात
गोंदिया : ‘चितारओळ’ हे नाव कानी पडताच नागपुरातील मूर्तिकारांची वस्ती असलेली बोळ डोक्यात येते. मूर्तिकारांचे निवास असल्याने नागपूरकरांचे कान्होबा, गणेशोत्सव, शारदा व दुर्गास्थापना हे सण येथूनच सुरू होतात. याच चितारओळीचे स्वरूप सध्या येथील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान चौक ते इंगळे चौक या मार्गाला आहे. लगतच्या परिसरातील मूर्तिकार मागील कित्येक वर्षांपासून येथेच आपले बस्तान मांडत असल्याने मूर्त्यांचे बुकिंग करण्यासाठी गोंदियातली ही ‘चितारओळ’ गजबजू लागली आहे.
जिवती झाली की हिंदूधर्मियांच्या सणांना सुरूवात होते. एका पाठोपाठ एक सण येतात व हिंदू धर्मियांसाठी हा काळ चैतन्याचा असतो. यात कान्होबापासून मूर्ती पूजनाचे सण सुरू होता. त्यानंतर गणपती, शारदा, दुर्गा, भुलाबाई व लक्ष्मीपूजन या क्रमाने मूर्ती पूजनाचे मुहूर्त असतात. शहरात मोठ्या संख्येत खासगी व सार्वजनिक स्तरावर हे उत्सव साजरे केले जात असल्याने येथील उत्सवांची लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यापर्यंत ख्याती आहे. तर या सणांची भव्यता बघण्यासाठी या राज्यांतील भाविक शहरात येतात.
नेमकी हीच बाब हेरून परिसरातील मूर्तिकार सध्या आपल्या परिवारासह सध्या सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिर ते इंगळे चौक व परिसरात ठाण मांडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून हे मूर्तिकार येत असल्याने त्यातही आपल्या इमारत व जागेत त्यांच्या हातून देव घडत असल्याने या रांगेतील रहिवासी स्वेच्छेने आपली जागा त्यांना देतात. यामुळे मूर्तिकारसुद्धा हक्काने आता येथे येत असून आपला व्यवसाय करतात. येत्या ५ सप्टेंंबर रोजी जन्माष्टमी तर १७ सप्टेंबर रोजी गणपती स्थापनेचा मुहूर्त आहे. त्यामुळे आता मोजकेच दिवस असल्याने मूर्तिकार दिवस- रात्र एक करून मातीला आकार देण्यात रमले आहेत.
विशेष म्हणजे येता-जाता तयार होत असलेल्या मुर्त्या बघून सिव्हील लाईंसवासीयांसह अन्य भागातील नागरिकसुद्धा आकर्षित होत आहेत. शिवाय ऐनवेळी धावपळ होत असल्याने आतापासूनच मूर्त्यांचे बुकिंग सुरू झाले आहे.
आपली मूर्ती सर्वांपेक्षा वेगळी व बजेटमध्ये असावी यासाठी नागरिक मूर्तिकारांकडे बसून बुकिंग करून घेत आहेत. यामुळे दिवसभराच्या त्यांच्या ये-जामुळे गोंदियातली ही ‘चितारओळ’ सध्या चांगलीच गजबजू लागली आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Gudiyatli 'Chitraol'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.