एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात घोळ
By Admin | Updated: September 2, 2014 23:52 IST2014-09-02T23:52:08+5:302014-09-02T23:52:08+5:30
शेतीच्या विकासासाठी कृषी विभागाकडे विविध योजना येतात. अनेक उपक्रम व प्रशिक्षणातून कृतीशील मार्गदर्शनाचे कार्य राबविले जाते. कृषी विभागाकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या नावे शेतकरी पॅकेज जाहीर केले जाते.

एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात घोळ
काचेवानी : शेतीच्या विकासासाठी कृषी विभागाकडे विविध योजना येतात. अनेक उपक्रम व प्रशिक्षणातून कृतीशील मार्गदर्शनाचे कार्य राबविले जाते. कृषी विभागाकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या नावे शेतकरी पॅकेज जाहीर केले जाते. त्या निधीचा उपयोग करून विविध योजना राबविल्या जातात. मात्र या निधीचा उपयोग कमी व दुरूपयोग अधिक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
केंद्र शासनाच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत (आयडब्ल्यूएमपी) वॉटर शेड डेव्हलपमेंट टीम (डब्ल्यूडीटी) तयार करण्यात आली. तालुका कृषी विभाग स्तरावर या टीमचे सदस्य ठेवण्यात आले आहेत. त्यांचे काम एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामस्तरावर स्थापित पाणलोट समितीच्या सहकार्याने विकासात्मक कामे आखणे, ती कामे पूर्ण करून घेणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, असे आहे.
तिरोडा तालुका कृषी विभागाकडे वॉटर शेड डेव्हलपमेंट टीमचे १२ सदस्य आहेत. तिरोडा कृषी विभागांतर्गत चार क्लस्टर (क्षेत्र) तयार करण्यात आले आहेत. त्यात मुंडीकोटा, तिरोडा, कवलेवाडा व सेजगावचा समावेश आहे. या चार क्लस्टरमध्ये तीन सदस्यांची विभागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाची कामे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या निर्देशनात मुंडीकोटा व तिरोडा येथील मंडळ कृषी अधिकारी पहात आहेत.
एकात्मिक पाणलोट क्षेत्रांतर्गत सदस्य, तालुका, मंडळ कृषी अधिकारी व ग्रामीण भागात पाणलोट समित्यांच्या सहकार्याने विविध कामे पूर्ण केली जातात. मात्र या कामांत पारदर्शकता दिसून येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. पाणलोट क्षेत्रात तालुक्यातील २७ ते ३३ गावे घेण्यात आली आहेत.
परंतु या योजनेतून होणाऱ्या कामात अनियमितता होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.(वार्ताहर)