सालेकसा तालुक्यात हिरवळ

By Admin | Updated: July 8, 2016 01:53 IST2016-07-08T01:53:53+5:302016-07-08T01:53:53+5:30

राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र शासनाने केला होता. या संकल्पाला शंभर टक्के प्रतिसाद देत सालेकसा तालुक्यात विविध संगठन,

Greenwall in Sailakasa taluka | सालेकसा तालुक्यात हिरवळ

सालेकसा तालुक्यात हिरवळ

विविध यंत्रणांचा सहभाग : पावणेदोन लाख रोपट्यांची लागवड
सालेकसा : राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र शासनाने केला होता. या संकल्पाला शंभर टक्के प्रतिसाद देत सालेकसा तालुक्यात विविध संगठन, लोकसहभाग तसेच सरकारी यंत्रणेतील सर्व विभागाच्या सहकार्याने वन विभागाने पावणे दोन लाख रोपटे लावण्यात यश प्राप्त केले, अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगळे व तालुक्याचे वनपरिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान यांनी लोकमतला दिली आहे.
तालुक्यात एकूण ४२ ग्रामपंचायती असून यापैकी १४ गावांची निवड करून वन विभागाने वृक्षारोपणाचा संकल्प घेत विशेष मोहीम राबवून दीड लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर प्रशासकीय स्तरावर इतर सर्व गावांमध्ये ग्रामपंचायत व शाळा-महाविद्यालयाच्या सहकार्याने २५ हजार वृक्ष लावण्यात आले. असे एकूण पावने दोन लाख वृक्ष सालेकसा तालुक्यात लावण्यात आले. वृक्षारोपण अभियानात तालुक्यात सर्वस्तरावर यशस्वी सहभाग लाभल्याने तालुक्यात हिरवळ पसरणार आहे.
वनविभागाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात स्थानिक आमदारासह जि.प. अध्यक्ष, चार जिल्हा परिषद सदस्य, आठ पंचायत समिती सदस्य, ८४ ग्रा.पं. सदस्य, अशासकीय संगठनांचे ३१ कार्यकर्ते, वन व्यवस्थापन समितीचे ११० सदस्य, महिला बचत गटातील २९२ महिला, पोलीस विभागातील २४ कर्मचारी, एक हजार ८२३ विद्यार्थी व एक हजार १७४ नागरिकांच्या सहकार्याने आणि एक हजार ९३३ मजुरांच्या मदतीने एक लाख ४८ हजार रोपटे लावण्यात आले. यात तालुक्यातील २०० शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष सहभाग लाभला.
उर्वरीत रोपट्याची लागवड करण्यासाठी तहसील कार्यालय, कृषी कार्यालय ग्रामपंचायती, पंचायत समिती, पोलीस ठाणे, आरोग्य, सिंचन, शिक्षण तसेच अशासकीय संगठनांच्या सहकार्याने उद्दिष्टपूर्ती करण्यात आली. एकंदरीत सर्वस्तरावरील प्रयत्नामुळे तालुक्यात एक लाख ७१ हजार २६५ रोपट्यांची लागवड करण्यात आली.
यंदा वृक्षारोपण कार्यक्रम जनआंदोलन बनले असून यात शासन प्रशासनातील पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, सामान्य नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, महिला-मुलींच्या तसेच पोलीस, सुरक्षा दल यांच्यासह स्वयंसेवी संस्थासुध्दा नि:स्वार्थ भावनेने पुढे येऊन सहभाग दिला.(तालुका प्रतिनिधी)

-१२ हजार रोपट्यांची लागवड
वनविभागाच्या विशेष पुढाकाराने ज्या १४ गावांत वृक्षारोपण कार्यक्रमाची विशेष मोहीम राबविण्यात आली, त्यामध्ये गिरोला येथे ९६३ लोकांनी ११ हजार रोपटे लावले. हलबीटोला परिसरात २७४ लोकांनी १२ हजार वृक्ष लावले. निंबा परिसरात ७५७ लोकांनी पाच हजार ५०० झाडे लावली. बिंझली परिसरात २५३ लोकांनी ११ हजार वृक्ष लावले. टोयागोंदी क्षेत्रात ६३५ लोकांनी ११ हजार वृक्ष, धनेगाव परिसरात ४३३ लोकांनी पाच हजार ५०० वृक्ष, कडोतीटोला परिसरात १७१ लोकांनी पाच हजार ५०० वृक्ष, पाथरी (कुंभारटोला) भाग-१ क्षेत्रात ४५५ लोकांनी १२ हजार रोपटे, कुंभारटोला भाग-२ क्षेत्रात २९८ लोकांनी १८ हजार ४८० वृक्ष, दुर्गुटोला परिसरात २२७ लोकांनी १० हजार वृक्ष, भजियादंड क्षेत्रात १७८ लोकांनी १० हजार, शेरपार क्षेत्रात ३०२ लोकांनी १२ हजार रोपटे, दरबडा क्षेत्रात ४०१ लोकांनी १२ हजार वृक्ष आणि खोलगड परिसरात ३४० लोकांनी १२ हजार वृक्षाची लागवड केली.

पोलीस ठाण्यात वनमहोत्सव
सालेकसा पोलीस ठाणे परिसरात पोलीस कर्मचारी व सी-६० च्या जवानांनी वन महोत्सव कार्यक्रम साजरा करीत वृक्षारोपण केले. पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांच्या मार्गदर्शनात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन याविषयी चर्चासत्र घेवून मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने एक रोपटे लावले. या वेळी ८० पेक्षा जास्त रोपटे लावण्यात आले. तसेच वृक्षांना खत पाणी घालून संवर्धित करण्याचा संकल्प घेण्यात आला. या वेळी पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पोलीस कॉन्स्टेबल चौधरी, चव्हाण, यादव, दिक्षीत, गिरी, दसरिया यांच्यासह पुरूष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Greenwall in Sailakasa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.