रस्त्यांच्या खोदकामाने नागरिकांची चांगलीच कसरत
By Admin | Updated: May 8, 2014 02:18 IST2014-05-08T01:52:00+5:302014-05-08T02:18:01+5:30
शहरातील नेहरू चौकातील बाजार रस्ता तर आंबेडकर चौकात महाविद्यालय रस्त्यावर बांधकाम सुरू असल्याने दोन्ही रस्ते आवागमनासाठी बंद करण्यात आले आहे.

रस्त्यांच्या खोदकामाने नागरिकांची चांगलीच कसरत
गोंदिया : शहरातील नेहरू चौकातील बाजार रस्ता तर आंबेडकर चौकात महाविद्यालय रस्त्यावर बांधकाम सुरू असल्याने दोन्ही रस्ते आवागमनासाठी बंद करण्यात आले आहे. यामुळे मात्र नागरिकांची चांगलीच कसरत होत आहे. बाजार भागात प्रवेश करण्यासाठी दोन मुख्य रस्ते असून दोन्ही बंद असल्याने नागरिकांना फिरून जावे लागत आहे. भर उन्हात नागरिकांना ही कसरत करावी लागत असल्यामुळे त्यांच्यात नाराजी दिसून आली. शहरातील रस्त्यांच्या बेहालीमुळे नागरिक अगोदरच चांगले रागावले आहेत. जनप्रतिनिधी फक्त बाताड्या हाकतात मात्र काम काहीच करित नसल्याचा त्यांना चांगलाच अनूभव आला आहे.
त्यात वाढीव पाणी पुरवठा योजनेने रस्त्यांची उरली सुरली कसर पूर्ण केली. चांगले-चांगले रस्ते पाईप लाईनसाठी खोदण्यात आले आहेत. त्यात मागील काही दिवसांपासून बाजार भागात रस्त्यांचे खोदकाम सुरू आहेत. यामुळे बाजारातील रस्ते डोकेदुखीचे झाले आहेत. अशात आता मंगळवारपासून शहरातील नेहरू चौकातून बाजाराकडे जाणारा रस्ता खोदण्यात आला आहे. काल तर अर्धाच रस्ता खोदण्यात आला होता. त्यातून कसा तरी रस्ता काढून नागरिक ये-जा करित होते. मात्र आज पूर्णच रस्ता खोदण्यात आल्याने येथून आवागमन बंद ठेवण्यात आले आहे. हाच प्रकार आंबेडर चौकात दिसून येत आहे. महाविद्यालय रस्ता खोदण्यात आला असून तेथेही दुरूस्तीचे काम सुरू असल्याने हा रस्ता सुद्धा बंद करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे बाजारात जाण्यासाठी हे दोन मुख्य मार्ग असल्याने नागरिक नेहरू चौक रस्ता बंद असल्याने आंबेडकर चौक रस्ता पकडत आहे. मात्र हा रस्ता सुद्धा बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना येथूनही परतून जावे लागत असून गांधी प्रतिमा किंवा अन्य रस्त्याने बाजारात प्रवेश करावा लागत आहे. एकतर कडक उन्हामुळे नागरिकांना घरबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशात हे दोन्ही मुख्य रस्ते बंद करण्यात आल्याने नागरिकांना उन्हात येथून तेथे भटकावे लागत आहे. एकतर वेळेची व त्यात फेरा मारून जावे लागत असल्याने पैशांची उधळपट्टी होत असून यामुळे नागरिकांत चांगलाच रोष निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)