निधीअभावी अडले २५० लाभार्थ्यांचे अनुदान
By Admin | Updated: February 28, 2017 00:57 IST2017-02-28T00:57:54+5:302017-02-28T00:57:54+5:30
जिल्ह्यात अनाथ निराधार, एक पालक, एचआयव्हीग्रस्त पालकांची मुले, शिक्षा भोगत असलेल्या ...

निधीअभावी अडले २५० लाभार्थ्यांचे अनुदान
बाल संगोपन : निरीक्षणगृहाचा प्रस्तावच नाही
गोंदिया : जिल्ह्यात अनाथ निराधार, एक पालक, एचआयव्हीग्रस्त पालकांची मुले, शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांच्या मुलांकरीता महिला व बालविकास विभागामार्फत बाल संगोपन ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कार्यालय स्तरावर २३० व संस्था स्तरावर २० असे एकूण २५० लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहे.
सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षात महिला व बालविकास विभागाकडून या योजनेवर निधी प्राप्त झाला नसल्यामुळे २५० लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबीत आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत सदर निधी उपलब्ध करून दयावा यासाठी आयुक्त, महिला व बालकल्याण, पुणे यांचेकडे पाठपुरावा केला जात आहे. सदर योजनेवर लवकरच निधी मिळणार असून निधी प्राप्त होताच सन २०१५-१६ आणि सन २०१६-१७ या वर्षाचे सर्व प्रलंबीत अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार असल्याचे प्रभारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी नम्रता चौधरी यांनी कळविले.
जिल्ह्यात एकाही स्वयंसेवी संस्थेने निरिक्षणगृह सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला नसल्यामुळे गोंदियामध्ये निरिक्षणगृह कार्यरत नसल्याचेही चौधरी यांनी सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)