भ्रष्टाचाराच्या आरोपात ग्रामसेवक निलंबित

By Admin | Updated: September 30, 2016 01:49 IST2016-09-30T01:49:30+5:302016-09-30T01:49:30+5:30

कट्टीपार येथील ग्रामपंचायतच्या दस्तावेजात अनियमितता व नियमबाह्य कामे केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यामुळे

Gramsevak suspended for corruption | भ्रष्टाचाराच्या आरोपात ग्रामसेवक निलंबित

भ्रष्टाचाराच्या आरोपात ग्रामसेवक निलंबित

कालीमाटी : कट्टीपार येथील ग्रामपंचायतच्या दस्तावेजात अनियमितता व नियमबाह्य कामे केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यामुळे ग्रामसेवक डी.के. महाकाळकर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल. पुलकुंडवार यांनी निलंबित केले.
पंचायत समिती आमगावअंतर्गत ग्रामपंचायत कट्टीपार येथे अनेक महिन्यापासून अनागोंदी कारभाराला ऊत आला होता. ‘चोर-चोर मौसेरे भाई’ म्हणून ग्राम पंचायतीत नागरिकांच्या पैशाची जोमात लूट सुरू होती. १६ जून २०१६ रोजी ग्राम पंचायतच्या रेकार्ड व कामांची पाहणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली. त्यात निविदा न मागविणे, बांधकाम अंदाजपत्रकाशिवाय खर्च नोंदविणे, शासकीय रकमेचा गैरवापर करणे, पदाचा गैरवापर करणे असे प्रकार आढळून आले. चौकशीअंती ग्रामसेवक महाकाळकर दोषी असल्याचे आढळून आले.
ग्रामसेवकपदाचे कार्य नियमबाह्य केल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम १९६७ चे नियम ३ चा भंग केल्यामुळे महाकाळकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन निलंबित करण्यात आले. (वार्ताहर)

स्थायी समितीतही स्वागत
कट्टीपार ग्रामपंचायतमधील नियमबाह्यकामांचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत यापूर्वी गाजला होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्यामुळे गुरूवारी (दि.२९) राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प.चे गटनेता गंगाधर परशुरामकर, ज्येष्ठ सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Gramsevak suspended for corruption