बंदोबस्तात पार पडली ग्रामसभा
By Admin | Updated: December 4, 2014 23:10 IST2014-12-04T23:10:27+5:302014-12-04T23:10:27+5:30
तालुक्यातील महागाव येथील शासकीय जमीन गट क्र.५८ मधील ०.४० हे.आर. जागा भारतीय बौद्ध स्मारक संस्थेला बौद्ध विहाराचे बांधकाम व इतर कार्यक्रमासाठी मंजूर करण्यासंदर्भात

बंदोबस्तात पार पडली ग्रामसभा
३५ वर्ष जुने प्रकरण : हजारांवर गावकऱ्यांची उपस्थिती
अर्जुनी/मोरगाव : तालुक्यातील महागाव येथील शासकीय जमीन गट क्र.५८ मधील ०.४० हे.आर. जागा भारतीय बौद्ध स्मारक संस्थेला बौद्ध विहाराचे बांधकाम व इतर कार्यक्रमासाठी मंजूर करण्यासंदर्भात ग्रामसभा घेऊन हा ठराव गावकऱ्यांसमोर ठेवण्यात यावा यासाठी ४ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या जमिनीचा गेल्या ३५ वर्षांपासून वाद सुरू आहे. पूर्व परिस्थिती लक्षात घेत चोख बंदोबस्तात ही सभा पार पडली. विशेष म्हणजे या ग्रामसभेनिमित्त बंद पाळण्यात आला असून सभेला एक हजार २४३ गावकरी उपस्थित होते.
या संबंधाने ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत गोंदिया येथे सभा घेण्यात आली. त्यानुसार तहसीलदार संतोष महाले यांनी महागाव ग्रामपंचायतला पत्र देऊन ग्रामसभेचे कार्यवृत्त सादर करण्यास कळविले. या अनुषंगाने ४ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी यशवंत परशुरामकर होते. यावेळी मंचावर सरपंच गुरुदेव उपरीकर, सत्यपालसिंह पवार, ग्रा.पं. सदस्य नेवारे, देशमुख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रावण निमकर, पोलीस पाटील झोडे, पं.स.चे माजी उपसभापती नारायण ठाकरे, के.टी. शहारे, आर.के. देशमुख, तुकाराम देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामसभेची सुरुवात झाली व यावेळी जमीन मंजूर करण्यासंदर्भात गावकऱ्यांचे मनोगत ऐकण्यात आले. मत व्यक्त करणाऱ्या सर्वांनीच ही जागा बौद्ध स्मारक समितीला देण्यात येऊ नये असे मत व्यक्त केले. तर या वादग्रस्त जागेवर तारेचे कुंपन अथवा सुरक्षाभिंत तयार करण्याची मागणी काही गावकऱ्यांनी केली. ग्रामसभेचे अध्यक्ष परशुरामकर यांची भूमिका अत्यंत आक्रमक होती. या सभेत तहसीलदार का उपस्थित झाले नाही. याविषयी प्रचंड आगपाखड करण्यात आली. शेवटी या ग्रामसभेत उपस्थित असलेल्या एक हजार २४३ लोकांना १५० रुपये मजुरी देण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल व आंदोलनाच्या दिवशी ही १५० रुपयांप्रमाणे मजुरी वसूल करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वारंवार ग्रामसभा घेऊन गावातील जनतेस वेढीस घेण्याचा प्रकार केला जात आहे असा आरोपही त्यांनी केला. ग्रामसभेला लागणारा खर्च बौध्द स्मारक समितीकडून वसूल करण्यात यावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी गावकऱ्यांच्या उपस्थितीत ठरावांचे वाचन करण्यात आले. उपस्थितांनी हात उंचावून ठराव संमतीला दुजोरा दिला. एकमताने ठराव पारीत करण्यात आला. या ग्रामसभेत बौध्द स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित झाले नाहीत. बौध्द स्मारक समितीला गट क्र. ५८ ची जागा दिली जाणार नाही. शासकीय यंत्रणेने गट नं. ५८ संबधी पुन्हा हुकूमत गाजवली तर त्यावेळी रक्तपात झाल्यास गावकरी जबाबदार राहणार नाही. यासाठी अधिकारीच जबाबदार राहतील. गट क्र. ५६, ५७ व ५८ हे ग्रामसभेत ठराव पारीत झाल्याशिवाय देता येणार नाही. गट नं. ५७ मधील अतिक्रमणास ग्रां.प.ला जबाबदार धरून ते पाडण्यात यावे. गट क्रं. ५७ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रास रद्द करण्यात यावे, तसेच गट क्र. ५८ मध्ये तारांच्या कुंपणासाठी ग्रां.प. कडे पैसे नसल्यास गावकऱ्यांनी गोळा करून ते पूर्ण करण्यासाठी सहमती दर्शविली. (तालुका प्रतिनिधी)