अंजोऱ्याच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित

By Admin | Updated: November 1, 2014 23:09 IST2014-11-01T23:09:32+5:302014-11-01T23:09:32+5:30

आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे महिलांनी संघटित होऊन पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत ५० टक्केपेक्षा जास्त महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मत दिल्यामुळे तळीरामांना चांगलीच चपराक बसली आहे.

In the Gram Sabha of Anjora, passed the resolution of drunkenness | अंजोऱ्याच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित

अंजोऱ्याच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित

साखरीटोला : आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे महिलांनी संघटित होऊन पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत ५० टक्केपेक्षा जास्त महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मत दिल्यामुळे तळीरामांना चांगलीच चपराक बसली आहे. विशेष म्हणजे मागील तीन वर्षापासून याकरिता अंजोरा येथील महिला प्रयत्नशील होत्या. परंतु येणकेन कारणामुळे हे प्रयत्न फळास येत नव्हते.
३० आॅक्टोबरला घेण्यात आलेल्या विशेष महिला ग्रामसभेत उपस्थित पहिलांपैकी ५० टक्केच्या वर महिलांनी दारूबंदी करण्यात यावी याचे समर्थन केले. या विशेष ग्रामसभेचा अहवाल शुक्रवारी गावचे सरपंच शिवणकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयाला सादर केला. तो अहवाल पडताळून पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी त्या गावात दारूबंदी लागू करायची किंवा नाही याचा निर्णय घेतील.
मागील तीन वर्षापासून सतत महिलांनी गावात दारुबंदी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतकडे रेटून धरली होती. त्यानुसार मागील वर्षात महिलांची ग्रामसभा घेण्यात आली होती. परंतु उपस्थित महिलांपैकी केवळ ४० टक्के महिलांनी समर्थन केल्याने दारुबंदी शक्य होऊ शकली नव्हती. मात्र गुरूवारी पार पडलेल्या सभेत सातशेच्यावर महिलांनी हजेरी लावून महिला शक्तीचा परिचय देत ५० टक्केच्यावर महिलांनी दारूबंदी करण्याचा निर्धार केला व त्यात त्या यशस्वी ठरल्या.
दारुबंदी अधिनियम २५ मार्च २००८ नियम (३) नुसार ग्रामसभेत उपस्थित महिलांपैकी ५० टक्केच्यावर महिलांनी दारुबंदी करण्यात यावी याचे समर्थन केल्यास जिल्हाधिकारी दारुबंदी घोषित करावी लागते. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या अधिनियमानुसार सदर तपासण्यात येते. महिला व ग्रामवासियांची मागणी लक्षात घेवून ३० आॅक्टोबरला ग्रामपंचायतच्या पटांगणात सरपंच अशोक शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक प्रशांत गोतमारे, आमगावचे ठाणेदार बी.डी. मडावी, नायब तहसीलदार बागडे, जि.प. सदस्य रमेश बहेकार, पं.स.चे विस्तार अधिकारी खोटेले, पोलीस उपनिरीक्षक शरद शेळके, पोलीस पाटील सुलोचना बहेकार, तंमुस अध्यक्ष पोतन रहांगडाले, मंडळ अधिकारी के.बी. कोरे, उपसरपंच संतोष गायधने, माजी सरपंच सरस्वता तुरकर, सुनीता चौबे, देवेंद्र मच्छिरके, रंजू चौधरी, तसेच उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस, ग्रामपंचायतचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
ग्रामसेविका उषा पाटील यांनी सभेचे प्रास्ताविक व रुपरेषा समजावून दिली तसेच उत्पादन शुल्क निरीक्षक गोटमारे यांनी सभेत करावयाच्या कारवाईची माहिती दिली व मतदार यादी भाग १०९ व ११० यातून उपस्थित महिलांचे नाव पुकारुन त्यांचे दारूबंदी विषयीचे समर्थन असल्याचे त्यांच्या नावापुढे नोंद करण्यात आली. मात्र ज्या महिलांकडे ओळखपत्र (मतदार) आहे त्यांनाच यात भाग घेता आला हे विशेष. यात उपस्थित महिलांपैकी ५० टक्केच्यावर महिलांनी दारुबंदी करण्यात यावी, असे मत व्यक्त केले.
ही प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. महिलांमध्ये भालीटोला, हलबीटोला व अंजोराच्या या गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या महिलांचा सहभाग होता. दारूबंदी करण्याकरिता सर्वप्रथम गावात दारुबंदी समिती गठित करण्यात आली होती. अंजोरा येथे परवानाप्राप्त एक देशी दारूची दुकान आहे.
दारुबंदी करण्याकरिता गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: In the Gram Sabha of Anjora, passed the resolution of drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.