ग्रामपंचायतीने चालविला शेतकऱ्याच्या झोपडीवर बुलडोझर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST2021-03-28T04:27:18+5:302021-03-28T04:27:18+5:30
गोंदिया : तालुक्यातील इर्री येथील एका शेतकऱ्याने २० वर्षांपूर्वी आपल्या खाजगी शेतात राहण्यासाठी झोपडी बांधलेली होती. ही बांधलेली झोपडी ...

ग्रामपंचायतीने चालविला शेतकऱ्याच्या झोपडीवर बुलडोझर ()
गोंदिया : तालुक्यातील इर्री येथील एका शेतकऱ्याने २० वर्षांपूर्वी आपल्या खाजगी शेतात राहण्यासाठी झोपडी बांधलेली होती. ही बांधलेली झोपडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असून ती अतिक्रमणात येत असल्याचा ठपका ठेवत शुक्रवारी (दि. २७) बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांनी आपले वडिलोपार्जित शेती गट क्रमांक १३४६ मधील शेतात आपल्या कुटुंबासह राहण्यासाठी झोपडी बांधली होती. या झोपडीत ते आपल्या कुटुंबासह राहत होते. शेतातील झोपडी ही ग्रामपंचायतीच्या जागेवर आहे, असा ठपका ठेवत ग्रामपंचायत प्रशासनाने ती शुक्रवारी बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, जीवनाेपयोगी साहित्य नष्ट झाले आहे. इर्री गावातील जवळपास शंभराच्या वर नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वेगवेगळ्या जागांवर अतिक्रमण केलेले आहे. एवढेच नव्हेतर, येथील एक खाजगी शाळादेखील अतिक्रमणाच्या जागेवर बांधण्यात आल्याचा आरोप आहे. असे असताना सरपंच, सचिव यांनी आकसापोटी ही कारवाई केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात येथील सरपंच व सचिव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
.......
कोट :
गावात अनेक नागरिकांचे अतिक्रमण आहे. त्यामुळे कारवाई ही सर्व अतिक्रमणधारकांवर करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता केवळ एका खाजगी जागेवरील झोपडी जमीनदोस्त करण्यात आली. या प्रकाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच कशी? या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून येथील सरपंच, सचिव, खंडविकास अधिकारी व तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
- ओमकार नंदलाल दमाहे, शेतकरी.
....
हा प्रकार अत्यंत खेदजनक असून, केवळ मनमानी कारभाराचा प्रकार आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा दबाव आणला होता. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणे गरजेचे आहे.
- रवी तरोने, उपसरपंच ग्रामपंचायत इर्री.
......