ग्राम पंचायतमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा
By Admin | Updated: February 10, 2016 02:11 IST2016-02-10T02:11:05+5:302016-02-10T02:11:05+5:30
गोंदिया तालुक्यांतर्गत येणाऱ्या सतोना धामनगाव ग्रामपंचायतचे सचिव व सरपंच यांनी संगनमत करून प्राप्त विकास निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार केला.

ग्राम पंचायतमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा
रावणवाडी : गोंदिया तालुक्यांतर्गत येणाऱ्या सतोना धामनगाव ग्रामपंचायतचे सचिव व सरपंच यांनी संगनमत करून प्राप्त विकास निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार केला. त्याबाबद ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी करण्यात येऊनही आजतगायत कधीच चौकशी करण्यात आली नाही. या विरोधात ९ फेब्रुवारी रोजी दोन्ही ग्रामपंचायतींवर भारतीय कम्युनिष्ट पार्टीचा वतीने धरने आंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या सचिवांनी संबंधितांना कळविले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दोन्ही ग्रामपंचायतींच्या सचिवांनी सरपंचाला हाताशी घेऊन बऱ्याच प्रमाणात नियमबाह्य कामे केली. त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वरिष्ठांना १ जून २०१५ व २९ जून २०१५ रोजी करण्यात आली. या दोन्ही वेळा झालेल्या गैरप्रकाराची तक्रार गावकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्या तक्रारीचा तपास अद्याप करण्यात आले नाही. यासाठी ग्रामस्थांनी कम्युनिस्ट पार्टीच्या सहकार्याने ग्रामपंचायतीवर धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
रस्ता बांधकाम, मनरेगा वृक्षारोपण, मजुरांचा मोबदला, तंटामुक्त समितीला प्राप्त निधीचा मनाप्रमाणे अनागोंदी खर्च, कामावर न जाताच बँक खात्यात निधी जमा होणे आदी नियमबाह्य विकास कामे झाली. त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला.
ग्रामीण नागरिकांकडून या बेकायदेशीर प्रकाराची तक्रार झाली. मात्र वरिष्ठांनी तक्रारीची दखलच घेतली नाही. परिणामी गावकऱ्यांना जनआंदोलन उभे करण्याची पाळी आली आहे. मंगळवारी ९ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतचे सचिव व सरपंचावर कारवाही झाली नाही तर १७ फेब्रुवारीला गोंदिया बालाघाट राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याची माहिती संबंधित कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. (वार्ताहर)