ग्रामपंचायत निवडणूक कमालीची रंगणार
By Admin | Updated: July 18, 2015 01:19 IST2015-07-18T01:19:19+5:302015-07-18T01:19:19+5:30
स्थानिक ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तालुका पातळीवरील राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने निवडणूक कमालीची रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक कमालीची रंगणार
बोंडगावदेवी : स्थानिक ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तालुका पातळीवरील राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने निवडणूक कमालीची रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. गावातील नेत्यांनी चारही वॉर्डात आपले समर्थक उभे केल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. पहिल्या प्रथमच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एकाच वॉर्डातून पती-पत्नी रिंगणात उतरले तर ‘माय-लेक दोन वॉर्डातून राजकीय आखाड्यात उतरल्याने गावात राजकीय वातावरण तापलेले आहे.
येत्या २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ११ जागेसाठी एकूण २९ उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. ४ वॉर्डात निवडणूक प्रक्रिया होणार आहे. ग्रामपंचायतस्तरावर आपले वर्चस्व अबाधीत राहून गावच्या राजकारणाची चाबी आपल्या हातात राहण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आपआपल्या समर्थकांच्या पॅनल घोडामैदानात उतरविल्या दिसत आहेत. वॉर्ड क्र.१ ,२ व ३ मध्ये तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. फक्त वॉर्ड क्र.४ मध्ये एका समाजाचे सर्वाधिक प्राबल्य असल्याचे सबक समोर ठेवून इतर पॅनलच्या उमेदवारांना माघारी घेण्याचे यशस्वी शिष्टाई नेत्यांनी केल्याने यामध्ये सरळ लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी पहिल्या प्रथमच भाजपा समर्थकांमध्ये दोन गट पडलेले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून गावात कोणत्या गटाचे प्राबल्य आहे हे मतदानानंतर दिसून येईल. वॉर्ड क्र. १ मध्ये विद्यमान ग्रा.पं. सदस्य राधेशाम झोळे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांची सौभाग्यवती वॉर्ड क्र.१ मधून सर्वसाधारण जागेसाठी मैदानात उतरल्या आहेत. पती-पत्नीच्या उमेदवारीने गावातील जनतेचे लक्ष वॉर्ड क्र.१ मध्ये लागलेले आहे. वॉर्ड क्र.१ मध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नलिनी नेवारे दुसऱ्यांना निवडणुकीत उभे असून वॉर्ड क्र.२ मधून त्यांचे चिरंजीव नामाप्र जागेमधून पहिल्या प्रथमच निवडणुकीत उतरले आहेत. गावातील तीन वॉर्डामध्ये तिहेरी लढत होण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. गावातील सर्वाच्या नजरा वॉर्ड क्र.४ मध्ये लागल्या आहेत. या वॉर्डात येथील मानवता विद्यालयाचे संचालक तसेच तालुका खरेदी विक्री समितीचे संचालक राकेश लंजे रिंगणात असून त्यांची लढत अमरचंद ठवरे यांच्याशी होणार आहे.
एकंदरित येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या प्रथमच गावातील प्रतिष्ठित व नवखे चेहरे उतरल्याने गावात राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.
अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षीत असल्याने कित्येकांना आतापासूनच सरपंच पदाचे डोहाळे लागलेले आहे. सरपंच पदाचे स्वप्न पाहून कित्येकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी राजकीय सारीपाटाची खेळी खेळून स्वत:च उमेदवारी हस्तगत केल्याचे गावात बोलल्या जात आहे. अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मतदानानंतर कळेल. सर्वाच्या नजरा ग्राम पंचयात निवडणुकीकडे आहेत. (वार्ताहर)