ग्रा.पं. सदस्यांना जि.प.-पं.स. उमेदवारीचे वेध
By Admin | Updated: June 4, 2015 00:54 IST2015-06-04T00:54:17+5:302015-06-04T00:54:17+5:30
येथील १३ सदस्यीय वडेगाव ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांना येत्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारीचे वेध लागले आहे.

ग्रा.पं. सदस्यांना जि.प.-पं.स. उमेदवारीचे वेध
वडेगाव ग्रामपंचायत : महिलांच्या पदरामागून राजकीय समीकरणे
वडेगाव : येथील १३ सदस्यीय वडेगाव ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांना येत्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारीचे वेध लागले आहे. त्यापैकी सहा सदस्यांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारीची प्रबळ दावेदारी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जून महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नियोजित आहेत. सदर निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांकरिता राखीव आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती गण विविध प्रवर्गाच्या महिलांकरिता राखीव झालेले आहेत. परंतु बहुतांश राजकीय पक्षांकडे समाजकार्यात अग्रगण्य महिला किंवा इतर महिला पदाधिकारी उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारीत महिला ग्रामपंचायत सदस्यांना प्राधान्य दिले जात आहे. याचाच सकारात्मक लाभ घेत वडेगाव ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी राजकीय पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
वडेगाव जि.प. क्षेत्राकरिता अनुसूचित जमातीच्या एकमेव ग्रा.पं. सदस्या वर्षा भरत धुर्वे यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांची भाजपची उमेदवारी जवळपास निश्चित असली तरी ऐनवेळी फेरबदलाची शक्यता नाकारता येत नाही. इतर पक्षांकडे महिला ग्रामपंचायत सदस्य उपलब्ध नसल्यामुळे समाजकार्यातील महिलेस उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात बाहेरील उमेदवार येणार नाही, हे निश्चित.
वडेगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच तुमेश्वरी लिलाधर बघेले यांनीसुद्धा भाजपकडे सरांडी जि.प. क्षेत्रातून उमेदवारी मागितली आहे. त्या क्षेत्रातील त्यांचा प्रस्थ पाहून पक्ष त्यांना उमेदवारी देण्यास अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.
वडेगाव पं.स. क्षेत्रातून ग्रामपंचायत सदस्य चंदा शर्मा, मंगला कावळे यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. याशिवाय समाज कार्यातील काही महिलांनीसुद्धा भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. तर समाज कार्यातील काही महिलांनीसुद्धा भाजपकडे उमेदवारीचा रेटा लावला आहे. परंतु पक्ष एखाद्या ग्रा.पं. सदस्य महिलेस उमेदवारी देण्यास अनुकूल असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ग्रामपंचायत सदस्य निता हिवराज रहांगडाले व ग्रा.पं. सदस्य राजेश कावळे यांच्या पत्नी वंदना कावळे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य रंजना कश्यप वालदे यासुद्धा उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.
वडेगाव ग्रामपंचायतच्या १३ सदस्यांपैकी सात महिला सदस्य आहेत. त्यात कोटांगले वगळता सर्वच महिला सदस्यांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारीचा रेटा लावून धरला आहे. तर उर्वरित सहा पुरुष ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे पुरुष कार्यकर्ते, सक्रीय नेत्यांना आता महिलांच्या पदरामागून राजकीय समिकरणे बांधावी लागत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)