शासनाने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी

By Admin | Updated: May 2, 2017 00:32 IST2017-05-02T00:32:07+5:302017-05-02T00:32:07+5:30

मागील अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-सेना युतीची सरकार विविध प्रकारच्या घोषणा करीत राहीली ....

Government should stop the joke of farmers | शासनाने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी

शासनाने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी

सहेसराम कोरोटे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पत्रकारांशी साधला संवाद
सालेकसा : मागील अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-सेना युतीची सरकार विविध प्रकारच्या घोषणा करीत राहीली व आश्वासनांचे लॉलीपॉप देण्याचे काम केले. परंतु प्रत्यक्षात या अडीच वर्षात शासनाने शेतकऱ्यांना कोणतीच मदत केली नाही. पोकळ आश्वासन देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी अन्यथा येणाऱ्या काळात जनता व शेतकरी वर्ग या शासनाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव सहेसराम कोरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना कोरोटे यांनी, सत्तेवर येण्यापूर्वी जे लोक धानाला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी करीत होते, तेच लोक आता सत्तेवर आल्यानंतर धानाला योग्य समर्थन मूल्य न देता साधा बोनस सुद्धा देऊ शकत नाही. तसेच नियमितरित्या कृषी उत्पादनाची खरेदी पण करु शकत नाही. व्यापाऱ्यांशी संगणमत करुन शेतकऱ्यांना लुबाडण्याची कामे शासनातील लोकांनी सुरू केली आहे. दीड वर्षापूर्वी सरकारने सालेकसा तालुक्यातील नऊ गावांना दुष्काळग्रस्त घोषित केले होते व त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचा गाजावाजा स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला होता.
परंतु दीड वर्ष लोटूनही त्यांनी शेतकऱ्यांना कवडीसुद्धा फेकून मारली नाही. अर्थातच विद्यमान सरकार घोषणाबाजी करण्यात पटाईत झालेली आहे. प्रत्यक्षात जनतेशी काही देणे-घेणे ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. एवढी थट्टा या आधीच्या सरकारने कधीच केली नव्हती. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांची तूर खरेदी बाबत ही सरकार तळ्यात-मळ्यात खेळ करीत आहे व शेतकऱ्यांना त्रस्त करण्याचे काम करीत आहे. शेतीत धानाशिवाय इतर गौण उत्पादन शेतकरी घेत असतात मात्र त्या उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे दिसत आहे. एकंदरित विद्यमान शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटातून संघर्ष करीत आहे. असे असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा देण्यासाठी सरकार मागे पुढे पाहत आहे. असे शेतकरी विरोधी सरकार कोणत्याच कामाचे नाही असे मत कोरोटे यांनी व्यक्त केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Government should stop the joke of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.