मेडिकल कॉलेज रखडण्यास शासनच जबाबदार
By Admin | Updated: July 18, 2015 01:09 IST2015-07-18T01:09:30+5:302015-07-18T01:09:30+5:30
नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने घेतला.

मेडिकल कॉलेज रखडण्यास शासनच जबाबदार
गोंदियावासीयांची भावना : दोन वर्षांपूर्वीची मंजुरी असूनही यावर्षी शुभारंभ नाहीच, तज्ज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल
गोंदिया : नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने घेतला. गोंदियासोबत चंद्रपूरलाही मेडिकल कॉलेजची मंजुरी मिळाली. मात्र ‘एमसीआय’च्या त्रुटी कायम असतानाही उच्च न्यायालयाच्या आदेशाने चंद्रपूरचे मेडिकल कॉलेज यावर्षी सुरू होत आहे, तर गोंदियाच्या कॉलेजला अजून किमान एक वर्ष तरी वाट पहावी लागणार आहे. मेडिकल रखडण्यासाठी शासनाची उदासीनताच जबाबदार असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लोकमत परिचर्चेत व्यक्त केली.
नक्षलग्रस्त गोंदियातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय या जिल्ह्यातील सरकारी रुग्णांलयात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. डॉक्टरांअभावी येथील रुग्णांना खासगी दवाखान्यात किंवा नागपूरला पाठविले जाते. यात वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावतात. त्यामुळे येथे मेडिकल कॉलेज सुरू झाल्यास तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊन गोरगरीब रुग्णांना वेळेवर चांगले उपचार मिळू शकतील. पण सध्यातरी हे मेडिकल कॉलेज गोंदियावासीयांसाठी स्वप्नच राहिले आहे.
यावर्षीही गोंदियाचे मेडिकल कॉलेज सुरू होऊ शकले नाही. या प्रकाराला शासन जबाबदार की प्रशासन, जबाबदार यावर लोकमतने विविध मान्यवरांशी चर्चा केली. गोंदियाच्या मेडिकलसाठी श्रेय लाटून घेणारे लोकप्रतिनिधी आणि नवीन सरकारमधील लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय उदासीनताही त्यासाठी जबाबदार असल्याचा सूर येथे उमटून आला.
विशेष म्हणजे राज्य सरकारने २०१४-१५ मध्ये या मेडिकल कॉलेजच्या कार्यालयीन खर्च व लहान बांधकामासाठी २०१४-१५ करिता ३.७३ कोटी तर २०१५-१६ करिता ३.५० कोटी अनुदानाची तरतूद केली. मात्र तरीही त्रुटी का दूर झाल्या नाहीत हा संशोधनाचा विषय आहे. यावर्षी नाही तर किमान पुढील वर्षीतरी मेडिकल कॉलेज सुरू होऊन तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळेल अशी आशा सर्वांना आहे. (तालुका प्रतिनिधी)
आघाडी सरकारच्या काळात गोंदिया मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही पाठपुरावा सुरूच ठेवला. चंद्रपूरमध्ये गोंदियापेक्षा जास्त त्रुटी असताना तिथे न्यायालयीन लढाईमुळे यावर्षी मेडिकल कॉलेजचे वर्ग सुरू होत आहेत. आता मी याबाबतची न्यायालयीन लढाई लढणार आहे. उच्च न्यायालयात त्याबाबतची जनहित याचिका दाखल करण्यासाठी जात आहोत. यावर्षी उशिर झाला असला तरी पुढील वर्षी मेडिकल नक्की सुरू होईल अशी आशा आहे.
-गोपालदास अग्रवाल
आमदार, गोंदिया
राजकीय मंडळींनी सत्ता गेल्यानंतर या मेडिकल कॉलेजकडे दुर्लक्ष केले. परिणामी येथील उणिवा तश्याच राहील्या. चंद्रपूरच्या लोकप्रतिनिधींनी लगेच न्यायालयाकडे धाव घेतल्यामुळे तेथील मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा झाला. परंतु येथे सत्तेबाहेरील किंवा सत्तेतील कोणताही लोकप्रतिनिधी पुढे न आल्यामुळे गोंदियाचे मेडिकल कॉलेज सुरू होऊ शकले नाही. विकासासाठी मतभेद विसरून नेत्यांनी अशावेळी जोर लागायला पाहिजे.
- प्रा.सविता बेदरकर
सामाजिक कार्यकर्त्या, गोंदिया.
मेडिकल कॉन्सील आॅफ इंडियाने (एमसीआय) सर्वेक्षण करताना गोंदियाच्या मेडिकलसाठी असलेल्या तृट्यांचे २१ मुद्दे सांगितले होते. परंतु त्या मुद्यांंची पुर्तता करण्यास प्रशासन अपयशी ठरले. याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे एमसीआयने गोंदियाचे मेडिकल कॉलेज नाकारले. यासाठी न्यायालयात जाणे गरजेचे होते. परंतु न्यायालयात न गेल्यामुळे गोंदियाच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा होऊ शकला नाही.
- डॉ.मनोज राऊत
जिल्हा उपाध्यक्ष, अधिकारी-कर्मचारी संघ
वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा पूर्ण करण्याच्या सूचना एमसीआयकडून दिल्यावरही त्या सूचनांचे पालन न केल्यामुळे गोंदियाच्या मेडिकलसाठी अडचणी आल्या. त्यासाठी तळमळीने कोणी पुढाकार न घेतल्यामुळे हे महाविद्यालय मंजूर होऊ शकले नाही. लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटना उदासीन असल्यामुळे ही वेळ आली आहे.
- डॉ.सुवर्णा हुबेकर,
बाई गंगाबाई रुग्णालय, गोंदिया.
केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात रूग्णांना मिळणाऱ्या नरकयातना पुन्हा रूग्णांना सोसाव्या लागतील. येथील लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक या मेडिकल कॉलेजकडे दुर्लक्ष केले. मेडिकलअभावी येथील रूग्णालयातून रूग्णांना ‘रेफर टू नागपूर’ केले जाते. हा त्रास आता कायमचा राहणार आहे.
- हौसलाल रहांगडाले
राज्य कार्यकारिणी सदस्य, भाकपा
मेडिकल कॉलेजला मंजूर न होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत याची माहिती देणे योग्य होणार नाही. एमसीआयने त्यांच्या पाहणीत आढळलेल्या तृट्यांची परिपूर्ण माहिती दिली नाही. त्यामुळे मेडिकलच्या मंजुरीत अडचण कोणती हे निश्चित सांगता येत नाही.
- डॉ.ए.एन. केवलिया
प्र.अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.