शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांची होतेय थट्टा
By Admin | Updated: November 17, 2014 22:57 IST2014-11-17T22:57:10+5:302014-11-17T22:57:10+5:30
केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. अडीच हजार रुपये प्रति क्विंटल धानाला भाव द्या, अशी मागणी करणारेच आता शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत,

शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांची होतेय थट्टा
अर्जुनी/मोरगाव : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. अडीच हजार रुपये प्रति क्विंटल धानाला भाव द्या, अशी मागणी करणारेच आता शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत, असा आरोप तालुका शिवसेनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे केला आहे.
केंद्र व राज्यात आघाडी शासन सत्तेवर होते. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन रान माजविणारेच आता सत्तेत आहेत. त्यावेळी प्रति क्विंटल अडीच हजार रुपये धानाला भाव द्या, अशी भाजपची मागणी असायची. सत्तेवर येताच त्यांना या धानाच्या भाववाढीचा विसर पडला आहे. प्रति क्विंटल केवळ ५० रुपये भाववाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रकार सत्तारुढ शासनाने केला. शेतकरी विरोधी या शासनाचा शिवसनेने निषेध व्यक्त करून धानपिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाववाढ देण्याची मागणी केली आहे.
चालू खरीप हंगामात उत्पादित झालेल्या धानपिकाची आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झाली आहेत.
शासनाच्या निर्णयाप्रमाणे धान खरेदी केंद्राना इलेक्ट्रानिक वजनकाटे पुरविण्यात आले. परंतु धान खरेदी करणाऱ्या संस्था व अधिकाऱ्यांच्या संगनमताने सध्या खरेदी सुरू आहे. साध्या वजनकाट्याने सुरू असलेल्या खरेदीमुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे दीड ते दोन किलो नुकसान होत आहे.
साध्या वजनकाट्याने सुरू असलेली खरेदी त्वरीत बंद करण्यात यावी व इलेक्ट्रानिक्स वजन यंत्राने धान खरेदी व्हावी. अन्यथा येत्या ८ ते १० दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख शैलेशकुमार जायस्वाल, महिला प्रमुख किरण कांबळे, तालुका प्रमुख संजय पवार व कार्यकर्त्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)