परराज्यातील इसमास दिला शासकीय प्लॉट

By Admin | Updated: July 30, 2016 00:18 IST2016-07-30T00:18:00+5:302016-07-30T00:18:00+5:30

गावातील शासकीय आबादी जागेवरील भुखंड गावातील बेघर कुटुंबीयांना न देता मध्यप्रदेश राज्यातील एका व्यक्तीला देण्यात आले.

Government plot given by the state government | परराज्यातील इसमास दिला शासकीय प्लॉट

परराज्यातील इसमास दिला शासकीय प्लॉट

सावरा ग्रा.पं.चा अजब कारभार : चौकशीची गावकऱ्यांची मागणी
इंदोरा-बुज. : गावातील शासकीय आबादी जागेवरील भुखंड गावातील बेघर कुटुंबीयांना न देता मध्यप्रदेश राज्यातील एका व्यक्तीला देण्यात आले. तिरोडा तालुक्यातील सावरा ग्रामपंचायत मध्ये हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतने त्या कुटुंबाची ग्रामपंचायत रेकॉर्डवर नोंद करून कर आकारणी ही केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
सविस्तर असे की, तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सावरा (बोंडराणी) येथील भिमराव फकीरा देवगडे या इसमास सन १९७८-७९ मध्ये इंदिरा आवास योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले व बोंडराणी येथील गट क्रमांक ७२ व ७३ मधील भुखंड (प्लॉट) त्यांच्या नावाने देण्यात आले. त्या जागेवर लाभार्थी भिमराव देवगडे यांचे इंदिरा आवास तयार करण्यात आले. काही वर्षानी ते घर पडले व जमीनदोस्त झाले. याच कालावधीमध्ये भिमराव यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या जागेवर त्यांचा मेहुणा हरीदास शेंडे यांनी आपला कब्जा दाखविला.
हा प्लॉट कोणलाही विक्री करता येत नसतानाही ग्रामपंचायतच्या संगनमताने परराज्यातील मध्यप्रदेश येथील एका इसमास ४० हजार रुपयांत विक्री केला गेला. उल्लेखनीय असे की, विक्रीपत्र रजिस्ट्री करताना तो भुखंड बनोटे नामक इसमाच्या नावाने रजिस्ट्री विक्रीपत्र करण्यात आले व ग्रामपंचायतने या विक्रीपत्रांकडे दुर्लक्ष करीत सदर भुखंड मध्यप्रदेशातील व्यक्तीच्या नावाने करुन त्यांच्या नावावर कर आकारणी सुद्धा केली आहे.
एखादया इसमाच्या नावाने रजिस्ट्री झाली असेल त्याच व्यक्तीचे नाव नमुना ८ मध्ये दर्ज करता येते. दुसऱ्या व्यक्तीचे नाव कर आकारणी रजिस्टरमध्ये नमुना ८ वर करता येत नाही. परंतु येथील ग्रामसेवक व सरपंचाने ही नोंद कशी करुन घेतली हे कळण्यास मार्ग नाही. गावातील गरजू व्यक्ती जागेअभावी बेघर आहेत त्यांना घरकुल मिळत नाही व दुसरीकडे ग्रा.पं. प्रशासन शासकीय भुखंडाची बेजवाबदारपणे विक्री करीत आहे. हा कुठला अधिकार व कायदा असावा असे येथील नागरिकांना प्रश्न पडला आहे.
शासकीय आबादी खाली जागेची विक्री करण्याचा अधिकार मृतक भिमरावच्या मेहुण्याला कोणी दिला. मृतकाचे वारसदार नसताना सुद्धा या व्यक्तीने शासकीय आबादी भुखंड मध्यप्रदेशातील व्यक्तीला विक्री केलाच कसा असे अनेक प्रश्न ग्रामवासीयांच्या मनात येत आहेत. सदर प्रकरणाची चौकशी पंचायत समितीस्तरावरुन करून सदर भुखंड ग्रामपंचायतला हस्तांतरीत करुन शासन जमा करावे व या प्रकरणात सामील असलेल्या व्यक्तीवर कार्यवाही करावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Government plot given by the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.