शासकीय जमीन रुपांतरात तिरोडा एसडीओंकडून घोळ
By Admin | Updated: February 24, 2017 01:49 IST2017-02-24T01:49:25+5:302017-02-24T01:49:25+5:30
सध्या जिल्ह्यातील तिरोडा येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी देवरी येथे कार्यरत

शासकीय जमीन रुपांतरात तिरोडा एसडीओंकडून घोळ
विभागीय चौकशी होणार : नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या तक्रारी
गोंदिया : सध्या जिल्ह्यातील तिरोडा येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी देवरी येथे कार्यरत असताना शासकीय जमिनीचे नियमबाह्यपणे भोगवटदार वर्ग २ मधून भोगवटदार वर्ग १ या प्रकारात रूपांतर केले. याशिवाय इतरही काही मुद्यांवर त्यांच्या तक्रारी झाल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करण्याची तयारी महसूल विभागाकडून केली जात आहे.
तिरोडा येथे येण्याआधी सूर्यवंशी देवरी येथे कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी राखीव जंगलाची काही गटातील काबिल कास्तकारीची जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित केली. हे करताना आर्थिक देवाणघेवाण करून नियमांना डावलल्याची तक्रार आमगावचे आमदार संजय पुराम यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची तपासणी केली असताना सूर्यवंशी यांनी केलेले जमिनीचे रूपांतर नियमांना डावलून केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयासह विभागीय आयुक्तांना माहिती दिली. याशिवाय नियमबाह्यपणे केलेल्या जमीन रुपांतराची प्रकरणे रद्द करण्याचे निर्देश देवरीच्या विद्यमान उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते.
विशेष म्हणजे देवरी येथील पोलीस पाटील भरती प्रकरणातही सूर्यवंशी यांच्यावर आमदार पुराम यांनी ठपका ठेवला होता. एसडिओ सूर्यवंशी यांची ही कृती गंभीर असल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करण्याची सूचना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र अद्याप विभागीय चौकशी सुरू झालेली नसल्याचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नागरिकांशी लोकप्रतिनिधींशी अरेरावीच्या वागणूक प्रकरणीही सूर्यवंशी यांची चौकशी सुरू असून २८ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल व वनविभागाच्या अवर सचिवांनी दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आमदारांशीही पंगा
कार्यालयात आपली कैफियत घेऊन येणाऱ्या नागरिकांसोबत एसडिओ सुनील सूर्यवंशी यांची तुसडेपणाची वागणूक सर्वपरिचित आहे. मात्र लोकप्रतिनिधींसोबतही त्यांचे संबंध चांगले नाहीत. त्यामुळे आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे त्यांची तक्रार केली.
देवरी येथे असताना आ.संजय पुराम यांच्याशी अरेरावी केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तिरोड्याचे आ. विजय रहांगडाले यांच्याशीही त्यांनी पंगा घेतला. न.प. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू नसलेल्या ग्रामीण भागात त्यांची गाडी अडवून तपासणी करीत अधिकारीपणा गाजविला.