केंद्र सरकारने केला जनतेचा भ्रमनिरास
By Admin | Updated: October 7, 2014 23:36 IST2014-10-07T23:36:31+5:302014-10-07T23:36:31+5:30
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने केलेल्या खोट्या प्रचाराला मतदार बंधू-भगिनी बळी पडल्याने आपणाला पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीनंतर या क्षेत्रातील विजयी उमेदवाराने

केंद्र सरकारने केला जनतेचा भ्रमनिरास
पटेलांचे आवाहन : विकास कामांना गती देण्यासाठी कौल द्या
गोंदिया: लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने केलेल्या खोट्या प्रचाराला मतदार बंधू-भगिनी बळी पडल्याने आपणाला पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीनंतर या क्षेत्रातील विजयी उमेदवाराने विकासाची कामे तर केली नाहीच. परंतु त्यांचे दर्शनच दुर्लभ झाल्याने जनतेमध्ये आता विकासाच्या बाबतीत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. माझ्या मंत्रिपदाच्या काळात मंजूर झालेल्या विकास कामांना गती प्रदान करण्यासाठी आपण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून माझे हात बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी केले.
लोकसभा निवडणुकीनंतरच्या कालावधीत आपण ज्या-ज्या ठिकाणी फिरलो; जे मतदार, नागरिक मला भेटले. त्यांनी विकासाला खिळ बसल्याची भावना बोलून दाखविली. मी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्न केले आणि पुढे करीत राहणार असेही पटेल म्हणाले.
गोंदिया विधानसभा मतदार संघात राकाँ उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, टीव्हीवरून दाखविल्या जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या सामान्यातून पुढे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजयी करून विकासाला साथ द्या, असेही आवाहन पटेल यांनी केले.
सभेत मंचावर उमेदवार अशोक (गप्पू) गुप्ता, तालुका अध्यक्ष कुंदन कटारे, जि.प. सदस्य नरेंद्र तुरकर, जि.प. सदस्य उषा बरडे, सेवादलचे अध्यक्ष गणेश बरडे, प्रकाश देवाधारी, सुरपत खैरवार, सरपंच सरिता चव्हाण, चुनेश पटले व इतर मान्यवर उपस्थित होते.