गोठणगावची योजना आॅक्सिजनवर

By Admin | Updated: December 11, 2014 23:10 IST2014-12-11T23:10:20+5:302014-12-11T23:10:20+5:30

आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या या प्रकारामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील योजना बंद आॅक्सिजनवर आली आहे. असे झाल्यास परिसरातील १५ गावांत पाण्यासाठी हाहाकार होणार आहे.

Gothangaon plan on Oxygen | गोठणगावची योजना आॅक्सिजनवर

गोठणगावची योजना आॅक्सिजनवर

गोंदिया : आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या या प्रकारामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील योजना बंद आॅक्सिजनवर आली आहे. असे झाल्यास परिसरातील १५ गावांत पाण्यासाठी हाहाकार होणार आहे. त्यामुळे ही योजना जिल्हा परिषदेने चालवावी अशी मागणी पाणी पुरवठा मंडळाने केली आहे. या मागणीसाठी मंडळाने ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यासह ग्रामाणी पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
गोठणगावच्या या योजनेतून गोठणगाव येथील २२५, बोंडगाव ६०, सुरबन ३५, करांडली ११०, गंधारी ३०, रामनगर ४०, प्रतापगड ४५, मोरगाव १५०, निलज ४५, मालनकपूर २५, माहुरकूडा १०५, झरपडा ६५, बुधेवाडा २५, ताडगाव ४० व अर्जुनी येथील ४५० अशा प्रकारे या १५ गावांतील एकूण एक हजार ४०० कनेक्शधारकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र आजघडीला ही योजना चालविणाऱ्या पाणी पुरवठा मंडळाची आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या अशी स्थिती झाली आहे.
त्याचे असे की, प्रत्येक कनेक्शनधारकाकडून दरमहा ८० रूपये प्रमाणे एक लाख १२ हजार रूपयांची आवक आहे. तर योजनेचे महिन्याचे वीज बिल एक लाख ७५ हजार रूपये येत असून कर्मचाऱ्यांचा पगार व देखभाल दुरूस्तीपोटी ६० हजार रूपये असे एकूण दोन लाख ३५ हजार रूपयांचा खर्च होतो. म्हणजेच उत्पन्ना पेक्षा एक लाख २३ हजार रूपये जास्तीचा खर्च मंडळाला वहन करावा लागत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेकडून वीज बिलाची अर्धी रक्कम दिली जाते. मात्र तिही मंडळाने बील भरल्यानंतर दिली जात असल्याने अगोदर मंडळालाच वीज बिलाचा भरणा करावा लागतो. मात्र एवढी मोठी रक्कम मंडळाकडे राहत नसल्याने मंडळाची पंचाईत होते.
सध्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे तीन लाख ६० हजार ६६० रूपयांचे बील मंडळाकडे आले आहे. मात्र एवढी रक्कम नसल्याने मंडळ हे बील भरण्यास असमर्थ असून असे झाल्यास येत्या ३० तारखेपर्यंत विद्युत कंपनी वीज पुरवठा खंडीत करेल. असे झाल्यास योजना बंद पडून यावर अवलंबीत असलेल्या १५ गावांतील एक हजार ४०० कनेक्शनधारकांचे परिवार पाण्यापासून वंचित राहणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
अशात ही योजना जिल्हा परिषदेने स्वत:कडे घेऊन चालविण्याची मागणी पाणी पुरवठा मंडळाने केली आहे. यासाठी मंडळाने जिल्हाधिकारी यांच्यासह ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना ८ डिसेंबर रोजी निवेदन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gothangaon plan on Oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.