गोरेगाव तालुक्यात गावरस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात
By Admin | Updated: June 21, 2014 01:47 IST2014-06-21T01:47:36+5:302014-06-21T01:47:36+5:30
तालुक्यातील ९९ गावांमधील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

गोरेगाव तालुक्यात गावरस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात
गोरेगाव : तालुक्यातील ९९ गावांमधील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. मात्र तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींकडे अतिक्रमण हटाव समित्याच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात ग्रामविकास खात्याचा स्वतंत्र आदेश आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला या आदेशाचा विसर पडला आहे.
गावातील खुल्या किंवा शासकीय जागेवर गावकऱ्यांनी अतिक्रमण करू नये यावर नजर ठेवण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या स्वतंत्र विभागाने ग्रामपंचायत प्रशासनाला ‘अतिक्रमण हटाव समिती’ गठित करण्याचे आदेश दिले आहे. पण सदर आदेशाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल न घेतल्याने गावातील मुख्य रस्ते, जोडरस्ते, शासकीय जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत.
ग्रामविकास खात्याच्या स्वतंत्र विभागाने प्रत्येक गावात ग्रामसभेत अतिक्रमण हटाव समिती स्थापन करण्याचे आदेश सर्व पंचायत समितीतर्फे ग्रामपंचायतींना दिले होते. या समितीमध्ये सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, वकील यांचा समावेश करण्याचे आदेशात म्हटले होते. गावात ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना प्रथम सूचना करणे, नोटीस बजावणे, त्यानंतरही अतिक्रमण न काढल्यास पोलीस ठाण्याला माहिती देवून तालुका प्रशासनाच्या पुढाकाराने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे आदेशात नमूद आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे अतिक्रमण करणारे शिरजोर झाले आहेत. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला तेथील नागरिक जुमानत नसल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे.
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या अधिनस्थ ९९ गावे येतात. या गावातील रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. चारचाकी वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकांनी रस्त्यालगत काटेरी कुंपन केल्याने अनेकांचे अपघात झाले आहे. हा सर्व अतिक्रमणाचा प्रकार राजरोष सुरू असून याविरोधात आवाज उचलणारे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य ‘व्होटबँक’ कमी होईल या भितीने शांत आहेत.
या गावागावातील वाढत्या अतिक्रमणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यावर वेळीच कारवाई झाली नाही तर भविष्यात रस्ताच शोधण्याची वेळ प्रशासनाला येईल. भविष्याचा विचार करून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ज्ञ नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)