गुड न्यूज ! गुरुवारी जिल्ह्यात ‘नो पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:49+5:302021-02-05T07:49:49+5:30
गोंदिया : मार्च महिन्यापासून अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनाला आता भारतात मूठमाती दिली जात असल्याचे दिसत आहे. परिणामी देशातील ...

गुड न्यूज ! गुरुवारी जिल्ह्यात ‘नो पॉझिटिव्ह’
गोंदिया : मार्च महिन्यापासून अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनाला आता भारतात मूठमाती दिली जात असल्याचे दिसत आहे. परिणामी देशातील कित्येक राज्यांत आता नवीन बाधित आढळून येत नसल्याचे आकडे येत आहेत. त्यातच आता ९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात गुरुवारी (दि.२८) एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे आता जिल्ह्यातूनही कोरोना जात असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर झपाट्याने प्रसार झाला. यातून जिल्हाही सुटला नाही. कोरोनाने आपले पाय पसरल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १४००० पार झाली आहे. मात्र, जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यातील १३००० पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात १४४ क्रियाशील रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, आता देशातच कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत असून काही जिल्ह्यांत नवीन बाधित आढळून आले नाहीत. यातच गोंदिया जिल्हावासियांसाठी गुड न्यूज असून गुरुवारी (दि.२८) घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. गुरुवारी २२८ आरटीपीसीआर तर १६० रॅपिड अँटिजेन चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, त्यात एकही चाचणी पॉझिटिव्ह आली नाही. विशेष म्हणजे, मागील ९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात शून्य बाधितांचा दिवस उजाडल्याने आरोग्य विभागासह जिल्हावासियांनाही नक्कीच दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, दररोजच्या आकडेवारीतही बाधितांची संख्या घटत असल्याने आता नक्कीच कोरोना देश व जिल्ह्यातून जातोय हे दिसून येत आहे.
------------------------------
आणखी ८००० हजार लस मिळणार
भारतात तयार झालेल्या लसींचे सध्या लसीकरण केले जात असून यासाठी जिल्ह्याला १०००० लस देण्यात आल्या आहेत. त्यांचे फ्रंटलाईन वॉरियर्सला लसीकरण सुरू झाले आहे. त्यात आता जिल्ह्याला आणखी ८००० लस मिळणार आहेत. नागपूर येथे या लस येणार असून तेथून जिल्ह्यासाठी दिल्या जातात.