गुड न्यूज, कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST2021-04-24T04:29:32+5:302021-04-24T04:29:32+5:30

गोंदिया : एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे सातत्याने वाढत असताना मागील दोन-तीन दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिलासादायक ...

Good news, the graph of those who beat Corona soared | गुड न्यूज, कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावला

गुड न्यूज, कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावला

गोंदिया : एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे सातत्याने वाढत असताना मागील दोन-तीन दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील उपचार घेतलेल्या तब्बल ७४२ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.

कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वेगाने वाढत असल्याने काहीसे चिंतेचे वातावरण आहे. काेरोनावरील औषधांचा तुटवडा, ऑक्सिजनचा अभाव, अपुरे बेड यांमुळे जिल्ह्यात बिकट चित्र निर्माण होत होते. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढली होती. मात्र आता कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने काहीसा दिलासादेखील मिळत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ७४२ बाधितांनी मात केली; तर ६७५ नवीन रुग्णाची नोंद झाली. २१ बाधितांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयांत मृत्यू झाला. शुक्रवारी आढळलेल्या ६७५ रुग्णांमध्ये सर्वाधिक ३५० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ८७, गोरेगाव ३४, आमगाव ५९, सालेकसा १७, देवरी ३७, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७४ आणि बाहेरील राज्यातील सहा रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १२८०४९ जणांच्या स्रावनमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांपैकी १०५१९७ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी १२४१६३ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यांपैकी १०८४५७ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९०५० कोरोनाबाधित आढळले असून यांपैकी २१९७९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६६३८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ४४०० स्राव नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.

..............

प्रलंबित स्वॅब नमुन्यांची संख्या वाढली

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्रावनमुने तपासणी प्रयोगशाळेतील तब्बल १४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याचा स्रावनमुने तपासणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रयाेगशाळेकडे प्रलंबित असलेल्या स्रावनमुन्यांची संख्या वाढली आहे. सद्य:स्थितीत ४४०० स्रावनमुने प्रलंबित आहेत.

......

१ लाख ४० हजार नागरिकांना लसीकरण

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असून, जिल्हा आणि आरोग्य विभागाने आता कोरोना लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण १४० केंद्रांवरून लसीकरण सुरू असून आतापर्यंत १ लाख ४० हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.

.......

औषधांची समस्या कायम

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, कोरोनावरील औषधांचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची मागील तीन-चार दिवसांपासून पायपीट कायम आहे. नागपूरमध्येही औषधांचा तुटवडा असून कंपन्यांकडून पुरेसा औषधांचा पुरवठा होत नसल्याने गोंदिया येथील औषधविक्रेतेही हतबल झाले आहेत.

Web Title: Good news, the graph of those who beat Corona soared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.