घरगुती वातावरणात ‘शुभमंगल....सावधान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST2021-03-23T04:30:50+5:302021-03-23T04:30:50+5:30
बिरसी-फाटा : कोरोनाचे संकट लग्नातील चुकीच्या परंपरा रोखण्यासाठी यशस्वी ठरले आहे. कोरोनामुळे यावर्षीच्या लग्नसराईत घरगुती व साध्या पद्धतीने विवाह ...

घरगुती वातावरणात ‘शुभमंगल....सावधान’
बिरसी-फाटा : कोरोनाचे संकट लग्नातील चुकीच्या परंपरा रोखण्यासाठी यशस्वी ठरले आहे. कोरोनामुळे यावर्षीच्या लग्नसराईत घरगुती व साध्या पद्धतीने विवाह आटोपले जात आहे. परिणामी लग्नातील अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात टळत आहे.
लग्न एकदाच असे बोलून लग्नसोहळ्यांत लाखो रुपयांचा चुराडा होतो. ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे सुरू झाले. कीर्तनकार व प्रवचनकार अनेक वेळा खर्च टाळण्याचे आवाहन करतात. मात्र यात त्यांना अद्याप तरी फारसे यश आले नाही. जिल्ह्यात दरवर्षी हजारांवर लग्नसोहळे होतात व त्यात २ लाखांपासून ते कोट्यवधी रुपयांचा खर्चा केला जातो. काही श्रीमंत नागरिक तर श्रीमंतीचे दर्शन घडवतात. त्यांचे बघून गोरगरीब व मध्यमवर्गीयही कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे विवाह थाटामाटात करू लागले. ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी अनेक मंडळींनी आजपर्यंत प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. गोरगरीब कुटुंबीयांचा लग्नाचा खर्च वाचावा यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळे घेतात. यावर्षी कोरोनामुळे सामूहिक विवाह सोहळे रद्द झाले. मात्र, कोरोनामुळे गर्दीवर नियंत्रण आल्याने पर्यायाने खर्चावरही निर्बंध आले आहे.
लग्नसमारंभाचे सोहळे शाही थाटात करण्याची जणू परंपराच सुरू झाली आहे. लग्नपत्रिकेतील नावे, हळदी समारंभाला लाखो रुपये खर्च, वरातीत धुमधडाका, पक्वान्नांची जेवणावळ, मिरवणुकीला हत्ती, घोडे त्यात डीजेचा आवाज अशा लग्नसोहळ्यांवर आता आपसूकच निर्बंध आल्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च कमी झाला आहे.