अर्जुनीतील ‘एमआयडीसी’ला येणार अच्छे दिन
By Admin | Updated: December 6, 2015 01:43 IST2015-12-06T01:43:42+5:302015-12-06T01:43:42+5:30
जवळच्या निमगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ लघु औद्योगिक क्षेत्र मोरगाव/अर्जुनीत मुलभूत सोयी सुविधा ...

अर्जुनीतील ‘एमआयडीसी’ला येणार अच्छे दिन
पालकमंत्र्यांनी केले भूमिपूजन : उद्योगांसाठी विविध सोयी-सुविधा पुरविणार
अर्जुनी मोरगाव : जवळच्या निमगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ लघु औद्योगिक क्षेत्र मोरगाव/अर्जुनीत मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शुक्रवारी पूजापाठ करुन करण्यात आले.
निमगाव जवळील ११.९१ हेक्टरमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ लघु औद्योगिक क्षेत्र बनविण्यात येणार आहे. सदर एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सोयी- सुविधा पुरविण्याच्या कामाचे भूमिपूजन ना.बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, निमगाव ग्रा.पं. सरपंच देवाजी डोंगरे, जि.प. सदस्या कमल पाऊलझगडे, पं.स. सदस्या पिंगळा ब्राम्हणकर, भाजपा नेते विनोद नाकाडे, संदीप कापगते, माजी पं.स. सदस्य अल्का बांबोळे आदी उपस्थित होते.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात एमआयडीसी निर्माण घेवून उद्योगात भर पडून तालुक्यातील बेरोजगारांना कामाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी २० वर्षापूर्वी निमगाव येथील शेतकऱ्यांची ११.९१ हे.आर. शेतजमिन खरेदी करुन ती जमीन एमआयडीसीच्या नावाने सातबाऱ्यावर नोंद सुद्धा करण्यात आली होती.
यावेळी लघुऔद्योगिक क्षेत्राचे कार्यकारी अभियंता सुनील आकुलवार, साई कन्स्ट्रक्शन कंपनी चंद्रपूरचे राजेश बियानी, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक ए.आर. भामरे, उपअभियंता एस.टी. ईरावार तसेच निमगाव येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
एमआयडीसी जागेवरील भूमिपूजन सोहळा नाममात्र न राहता तीव्र गतीने मुलभूत सोईसुविधा निर्माण होऊन उद्योगाची फळी निर्माण व्हावी अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहेत. सदर जागेमधून सहा भूखंडाचे वाटप करण्यात आल्याचे एमआयडीसीचे भामरे यांनी लोकमतला सांगितले. यामुळे एमआयडीसीत उद्योगांना चालना मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. (शहर प्रतिनिधी)