अंत्योदय एक्स्प्र्रेसचे गोंदियात स्वागत
By Admin | Updated: March 21, 2017 00:58 IST2017-03-21T00:58:42+5:302017-03-21T00:58:42+5:30
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या द्विसाप्ताहिक अंत्योदय रेल्वेगाडीचे स्वागत गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर रविवारी करण्यात आले.

अंत्योदय एक्स्प्र्रेसचे गोंदियात स्वागत
गोंदिया : मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या द्विसाप्ताहिक अंत्योदय रेल्वेगाडीचे स्वागत गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर रविवारी करण्यात आले.
नागपूरवरून या रेल्वेगाडीने आलेले खासदार नाना पटोले यांनी गोंदिया स्थानकावर जिल्ह्याच्या वतीने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. तसेच पुढच्या प्रवासाकरिता रेल्वेगाडीला सकाळी ६.३० वाजता हिरवी झेंडी दाखविली.
ही गाडी लोकमान्य तिलक टर्मिनल (मुंबई) ते टाटानगर दरम्यान चालणार असून विनाआरक्षित रेल्वेगाडी आहे. विशेष म्हणजे या गाडीत बसण्यासाठी आरक्षण करण्याची गरज नाही.
गोंदिया स्थानकावर हिरवी झेंडी दाखविण्यात आली त्यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक सिब्बल, स्थानक व्यवस्थापक, मजूर सहकारी संघाचे उपाध्यक्ष दीपक कदम, नगरसेवक भरत क्षत्रिय, बंटी पंचबुद्धे, भाजप शहर अध्यक्ष सुनील केलनका, काँग्रेसचे महासचिव अमर वऱ्हाडे, नीलम हलमारे, अभय सावंत, इंद्रकुमार राही यांच्यासोबत अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई येथून शनिवार व मंगळवारी सकाळी ११ वाजता सुटेल आणि रविवार व बुधवारला सकाळी ६.४० वाजता गोंदिया स्थानकावर पोहोचेल. त्याचप्रमाणे सोमवार व गुरूवारला सकाळी ९ वाजता गोंदिया स्थानकावरून मुंबईकरिता रवाना होईल. (प्रतिनिधी)