गोंदियावासीयांचा पावसाळा ब्लिचिंग पावडरविनाच
By Admin | Updated: September 22, 2014 23:20 IST2014-09-22T23:20:33+5:302014-09-22T23:20:33+5:30
गोंदिया शहरात मागील महिनाभरापासून ब्लिचिंग पावडर नसल्याने नागरिकांनी नगर परिषदेला त्रस्त करून सोडले. नगर परिषदेने निविदा काढून ब्लिचिंग पावडरसाठी कंत्राटदाराकडून अर्ज मागीतले होते.

गोंदियावासीयांचा पावसाळा ब्लिचिंग पावडरविनाच
गोंदिया : गोंदिया शहरात मागील महिनाभरापासून ब्लिचिंग पावडर नसल्याने नागरिकांनी नगर परिषदेला त्रस्त करून सोडले. नगर परिषदेने निविदा काढून ब्लिचिंग पावडरसाठी कंत्राटदाराकडून अर्ज मागीतले होते. परंतु एकही अर्ज न आल्यामुळे सन २०१३-१४ मध्ये कंत्राट असलेल्या व्यक्तीकडूनच ब्लिचिंग पावडर खरेदी करण्यात आल्याचे न.प.च्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले. परंतू पावसाळ्याच्या एक महिन्याभरापेक्षा जास्त कालवधीत ब्लिचिंग पावडर नसल्यामुळे दूषित पाण्याचा सामना नागरिकांना करावा लागला.
गोंदिया शहराला एका वर्षात ५० पोती ब्लिचिंग पावडरची गरज असते. एका पोत्यामध्ये २५ किलो ब्लिचिंग पावडर असते. यावर्षी जुलै महिन्यात नगर परिषदेने ब्लिचिंग पावडरसाठी निविदा काढल्या होत्या. परंतु निविदेसाठी एकही अर्ज आला नसल्याचे न.प.चे म्हणणे आहे. त्यामुळे नगर परिषदेला नागरिकांची ओरड पाहून चंचल आॅफसेट अॅन्ड सप्लायर्स या गतवर्षीच्या कंत्राटदाराला जुलै महिन्यात ५०० किलो ब्लिचिंग पावडर पुरवठा करण्यास सांगण्यात आले. त्यातील २० पोती पावडर अवघ्या ८ दिवसातच संपले. पुन्हा नागरिकांची ब्लिचिंग पावडरसाठी ओरड सुरू झाली.
मागील महिनाभरापासून गोंदिया नगर परिषदेकडे ब्लिचिंग पावडर नव्हते. परंतु नागरिकांच्या सतत वाढत्या तक्रारीमुळे नगर परिषदेने आठ दिवसापूर्वी १० पोती ब्लिचिंग पावडर आणले. महिनाभराचा काळ पावसाळ्याचा होता. त्यामुळे शहरवासीयांना ब्लिचिंग पावडरची अत्यंत आवश्यकता होती. परंतु मुख्याधिकारी सुटीवर गेले. त्यामुळे स्वाक्षरी करायला कुणीही नसल्यामुळे ब्लिचिंग पावडर आणण्यात आले नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.(तालुका प्रतिनिधी)