अध्यक्षपदासाठी गोंदियात १४ तर तिरोड्यात ८ रिंगणात
By Admin | Updated: December 30, 2016 00:48 IST2016-12-30T00:48:17+5:302016-12-30T00:48:17+5:30
नगर परिषद निवडणुकीतील नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरूवारी (दि.२९) अनेक उमेदवारांनी पुढाकार घेतला.

अध्यक्षपदासाठी गोंदियात १४ तर तिरोड्यात ८ रिंगणात
आज चिन्हांचे वाटप : शेवटच्या दिवशी माघार घेण्यासाठी गर्दी
गोंदिया/तिरोडा : नगर परिषद निवडणुकीतील नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरूवारी (दि.२९) अनेक उमेदवारांनी पुढाकार घेतला. गोंदियात नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून १८ उमेदवारांनी तर सदस्यपदासाठी अर्ज करणाऱ्या ५० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
शुक्रवारी (दि.३०) अधिकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह सर्वांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा खरा रणसंग्राम सुरू होणार आहे. चिन्हवाटपानंतर सर्व उमेदवारांना निवडणुकीतील ओळख मिळाल्यानंतर प्रचाराला अधिक जोर चढणार आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम तसा ७ तारखेपासूनच सुरू झाला आहे. त्यात निवडणूक कार्यक्रमानुसार दाखल करण्यात आलेले नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस गुरूवारी (दि.२९) होता. त्यामुळे सध्यातरी रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांचा आतापर्यंत अस्पष्ट असलेला आकडा अखेर स्पष्ट झाला.
नगर परिषदेच्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी ३८ उमेदवारांनी ५२ अर्ज दाखल केले होते. सदस्यपदाच्या ४२ जागांसाठी २७७ अर्ज दाखल करण्यात आले होते.
मात्र गुरूवारी (दि.२९) नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठीचे १८ अर्ज मागे घेण्यात आले. तसेच सदस्यत्वसाठीचे ५० अर्ज मागे घेण्यात आले आहेत. हे अर्ज मागे घेण्यात आल्याने नगराध्यक्ष तसेच सदस्यांसाठीचे चित्र अधिकच खुलले असून आता उमेदवारांना आपली तयारी करायला अधिकच सुलभ होणार आहे.
त्यामुळे निवडणुकीचा ज्वर आता अधिकच चढणार असल्याचेही दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी)
आचारसंहिताभंगाच्या तक्रारीसाठी अॅप
गोंदिया नगरपरिषद निवडणुकीच्या कालावधीत कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ निवडणूक आयोगाला करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने एक अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून तक्रारकर्त्याची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. प्ले स्टोअरवर ते उपलब्ध आहे. या अॅपचा वापर करताना इंटरनेट व जीपीएस मॅपींग आॅन करावे लागेल. आचारसंहितेचा भंग होत असलेल्या घटनेची व्हिडिओ क्लीप त्यात संपूर्ण माहितीसह रेकॉर्डींग होऊ शकेल. ही क्लिप तत्काळ निवडणूक आयोगाकडे पोहोचेल व या घटनेबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशिल आपल्या रजिस्टर्ड मोबाईल व ई-मेल कळविला जाणार आहे.