गोंदियावासीयांनाही आता पाण्याच्या टँकरचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 01:27 IST2016-05-22T01:27:31+5:302016-05-22T01:27:31+5:30
गोंदिया शहरात आता एकच वेळ सकाळी नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुरेसे पाणी मिळण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत आहे.

गोंदियावासीयांनाही आता पाण्याच्या टँकरचा आधार
टँकरने पाणीपुरवठा : मध्यवस्तीला दिलासा
गोंदिया : गोंदिया शहरात आता एकच वेळ सकाळी नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुरेसे पाणी मिळण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. पण त्यातूनही पाणी मिळत नसल्यामुळे आता शहराच्या काही भागात नगर परिषद टँकरने पाणी पुरवठा करीत आहे. यामुळे बऱ्याच प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे शहरात एकच वेळ पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर टिल्लू मोटारी लावून पाणी खेचण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे बऱ्याच लोकांना पाणी मिळणे कठीण झाले होते. ‘लोकमत’ने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून गोंदियासह तिरोडा शहरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या वेळेस वीज पुरवठा खंडित ठेवणे सुरू झाले आहे. तरीही काही भागात पाणी पोहोचतच नाही. सिव्हील लाईनमध्ये नगरसेविका भावना कदम यांनी टँकरची सुविधा उपलब्ध केली आहे.
‘लोकमत’चा उपक्रम स्तुत्य व महत्त्वाचा
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे आता गरजेचे आहे आहे. कधी नव्हे इतकी पाण्याची झळ यावर्षी सर्वांना सहन करावी लागत आहे. ही झळ सहन केल्याशिवाय पाण्याचे महत्व कोणाला समजलेही नसते. आतातरी लोकांमध्ये जागृती येणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘लोकमत’ समुहाने सुरू केलेला जलमित्र हा उपक्रम अतिशय मोलाचा आहे. विशेषत: स्लम एरियात ही जनजागृती जास्त गरजेची आहे. त्या भागात अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. त्यातून पाणी वाहून जाते पण कोणाला काळजी नसते. घराच्या छतावरील, इमारतींवरील पावसाचे पाणी विहिरीत, बोअरवेलमध्ये फिल्टर करून टाकावे लागणार आहे, अशी भावना जीवन प्राधीकरणचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र मडके यांनी व्यक्त केली.