दुर्दम्य आत्मविश्वासाला गोंदियाकरांचा सलाम
By Admin | Updated: March 2, 2015 01:39 IST2015-03-02T01:39:24+5:302015-03-02T01:39:24+5:30
आदिवासी समाजात असलेला अशिक्षितपणा, त्यातच त्यांचे आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष, अशात त्यांचा उपचार करून विकासाच्या मार्गावर पाऊल टाकण्यात स्वत:चा देह झिजविणाऱ्या ...

दुर्दम्य आत्मविश्वासाला गोंदियाकरांचा सलाम
गोंदिया : आदिवासी समाजात असलेला अशिक्षितपणा, त्यातच त्यांचे आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष, अशात त्यांचा उपचार करून विकासाच्या मार्गावर पाऊल टाकण्यात स्वत:चा देह झिजविणाऱ्या डॉ. प्र्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहताना गोंदियातील पे्रक्षकांनी अक्षरश: अश्रूला वाट मोकळी करून दिली. पत्नीची साथ व दुर्दम्य आत्मविश्वासाच्या भरवशावर साता समुद्रापार कीर्ती मिळविणाऱ्या डॉ. आमटे दाम्पत्याला गोंदियाकरांनी सलाम केला.
निमित्त होते लोकमत युवा नेक्स्ट व आकृती थिंक टुडे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२८) प्रभात चित्रपटगृहात दाखविण्यात आलेल्या ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाच्या विशेष शो चे. या चित्रपटातून गोंदियाकरांना डॉ.प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी मंदा आमटे व त्यांच्या कार्यांची ओळख झाली.
स्वत:साठी आज सगळेच जगत आहेत. आपली पत्नी, आपली मुलं एवढेच त्यांचे जग उरले आहे. मात्र या संकुचित विचारसरणीवर मात करीत अर्धांगिनीला सोबत घेत उपेक्षित आदिवासींचे जीवन फुलविणाऱ्या आमटे दाम्पत्याच्या खडतर जीवनातून बरेच काही शिकण्याजोगे आहे. त्यांच्या जीवनाची ही वास्तविकता, त्यांचा संघर्ष व परिस्थितीवर मात करून त्यातून गवसलेले यश हे सर्वसामान्यांनाही माहिती व्हावे आणि त्यातून प्रेरणा घेता यावी या उद्देशातून गोंदियाकरांसाठी लोकमत युवा नेक्स्ट व आकृती थिंड टुडे बहुउद्देशिय संस्थेने या चित्रपटाचा एक शो नि:शुल्क दाखविला. राष्ट्रगीताने या चित्रपटाची सुरूवात करण्यात आली.
येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजीव दोडके, वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ, सावजी शिक्षण संस्थेचे संस्थापक सुरेश चौरागडे, डॉ.धनश्याम तुरकर, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, प्रा.सविता बेदरकर, शिक्षक समिती सचिव एल.यु. खोब्रागडे, पुरूषोत्तम मोदी आदींनी उपस्थित राहून दाद दिली. त्यांचे स्वागत लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत, आकृती थिंक टुडे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गुडधे यांनी केले.
या विशेष शोच्या आयोजनासाठी लोकमत बालविकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, जाहिरात प्रतिनिधी अतुल कडू, प्रा.बबन मेश्राम, प्रा.एच.पी. पारधी, दर्पण वानखेडे, लकी भोयर, पारस लोणारे, वर्षा भांडारकर, विजय ठाकरे, कुशल अग्रवाल आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
अन् विद्यार्थीही झाले गंभीर
तिकिटविना सिनेमा पाहायला मिळत असल्याने काही विद्यार्थी फक्त टाईमपास म्हणून एकत्रितपणे चित्रपट पाहायला आले होते. त्यामुळे सिनेमा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या बऱ्याच पैकी हालचाली व गमती-जमती सुरू होत्या. मात्र चित्रपट सुरू होऊन पुढे जात होता तसतसे हे विद्यार्थी गंभीर होत चालल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे काहींनी तर अश्रूंना वाट मोकळी करून देत आपले गांभीर्य व्यक्त करून दिले.
या शाळा-महाविद्यालयांचा सहभाग
या चित्रपटासाठी येथील नमाद महाविद्यालय, मनोहरभाई फार्मसी महाविद्यालय, जानकीदेवी चौरागडे महाविद्यालय, गुरूनानक महाविद्यालय, डी.बी. सायन्स महाविद्यालय, मारवाडी महाविद्यालय, जीपीजी महाविद्यालय, महषी विद्यालय, मनोहर म्युनिसिपल शाळा यासह अन्य शाळेतील विद्यार्थ्यासह त्यांचे प्राचार्य व शिक्षकगण उपस्थित होते
नि:स्वार्थ समाजसेवेचा परिचय
गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या गावातील आदिवासींची विदारक परिस्थिती या चित्रपटात विषद करण्यात आली आहे. डॉ.प्रकाश व डॉ.मंदा आमटे यांनी केलेले विलक्षण सामाजिक कार्य या चित्रपटातून दाखविण्यात आले. नि:स्वार्थ समाजसेवा कशी असते याचा प्रत्यक्ष अनुभव हा चित्रपट बघण्यासाठी एकत्र आलेल्या गोंदियाकरांनी अनुभवला.
मान्यवरही भारावून गेले
विलक्षण अनुभव देणारा चित्रपट
खरी समाजसेवा या चित्रपटातून दिसून येते. बाबा आमटे माझ्या गावचेच. हा चित्रपट विस्मयकारी व चमत्कारिक अनुभव देणारा आहे. नि:स्वार्थ समाजसेवा कशी असते याचे जिवंत चित्रण करण्यात आले. निर्मात्या अॅड.समृद्धी कोरे यांनी स्वत:चे पैसे पदरमोड करून ही कलाकृती समाजास अर्पण केली. तेथील आदिवासी माडिया भाषा वेगळी आहे. परंतु सर्वांना समजावा अशा भाषेत हा चित्रपट आहे.
- डॉ.संजीव दोडके
वैद्यकीय अधीक्षक, बीजीडब्ल्यु रूग्णालय.
दिशाहिनांना दिशा मिळेल
नवीन पिढीला समाजसेवेची दिशा दाखविणारा हा चित्रपट लोकमत युवा नेक्स्ट व आकृती संस्थेने बघण्यासाठी उपलब्ध करून दिला. हे खरंच युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
- किशोर धुमाळ
निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा
प्रत्येक शाळा व महाविद्यालयांत दाखवावे
लोकमततर्फे दाखविण्यात आलेला हा चित्रपट नवीन पिढीला प्रेरणा देणारा आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळा व महाविद्यालयांत दाखवायला हवा. जेणेकरून विद्यार्थ्यांना डॉ.प्रकाश आमटे यांच्या कार्यांची माहिती होईल व विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची प्रेरणा या चित्रपटातून मिळू शकेल.
- सुरेश चौरागडे
संस्थापक, जानकीदेवी चौरागडे शिक्षण संस्था
सर्वांनीच प्रेरणा घ्यावी
डॉ. प्रकाश आमटे यांचे कार्य प्रेरणादायक आहे. सर्वांनीच त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्यापरीने जमेल ते इतरांसाठी व समाजासाठी करण्याची गरज असल्याचे चित्रपटात दाखविले आहे.
- डॉ.धनश्याम तुरकर
जिल्हा उपाध्यक्ष, इंडियन मेडीकल असोसिएशन.