गोंदियाकरांना पुणेरी मूर्त्यांची भुरळ
By Admin | Updated: August 30, 2014 01:50 IST2014-08-30T01:50:40+5:302014-08-30T01:50:40+5:30
गणरायाचे रूप बघावे तेवढे कमीच. त्यामुळेच प्रत्येक मुर्तीकार आपल्या कल्पकतेतून गणरायाची मूर्ती साकारतात. यावर्षी मात्र गोंदियाकरांना पुणेरी मुर्त्यांनी भुरळ घातल्याचे दिसून आले.

गोंदियाकरांना पुणेरी मूर्त्यांची भुरळ
कपिल केकत गोंदिया
गणरायाचे रूप बघावे तेवढे कमीच. त्यामुळेच प्रत्येक मुर्तीकार आपल्या कल्पकतेतून गणरायाची मूर्ती साकारतात. यावर्षी मात्र गोंदियाकरांना पुणेरी मुर्त्यांनी भुरळ घातल्याचे दिसून आले. येथील दोघा तरूण व्यापाऱ्यांनी थेट पुण्याहून गणपतीच्या मूर्ती मागविल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडील मुर्त्या हातोहात खपल्या असून यातूनच गोंदियाकरांमध्ये पुणेरी मुर्त्यांचे आकर्षण असल्याचे दिसून आले.
गोंदिया शहरातील गणेशोत्सवाची ख्याती बघता लगतच्या परिसरासह छत्तीसगड राज्यातील मुर्तीकार यंदा गोंदियात आपली कला सादर करण्यासाठी आले आहेत. गणरायाचे नानाविध रूप असल्याने प्रत्येक मुर्तीकार अधिकाधिक आकर्षक मुर्ती साकारण्यासाठी जिवाचे रान करतो. वेगवेगळ््या आकर्षक मुर्त्यांमुळेच गोंदियातला उत्सव भव्य-दिव्य होऊन त्याची ख्याती पसरतच चालली आहे.
असे असतानाही, पुणेरी मुर्त्यांची बनावट व त्यांचे आकर्षण काही औरच असते. पाहताक्षणी मनाला मोहून टाकणारा गणरायाचा देखणा चेहरा ही पुणेरी मुर्त्यांची खासीयत आहे. यामुळेच येथील दोघे तरूण थेट दौंड (पुणे) येथून गणरायाच्या मुर्त्या घेऊन आले आहेत. कार्तिक माटे व चेतन कुरील (रा.कृष्णपुरा वॉर्ड) अशी या तरूणांची नावे आहेत. पुणेरी मुर्त्यांची विक्री करण्याचे हे त्यांचे नववे वर्ष असले तरी यावर्षी नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला असल्याचे त्यांनी सांगितले.
दौंड येथे मामाच्या घरी गेलो असता तेथील मुर्त्या बघून गोंदियात यांची विक्री करण्याचे डोक्यात आले. त्यावर्षी मोजक्याच मुर्त्या आणल्या होत्या, पण गोंदियाकर आकर्षित झाल्याने सर्व मुर्त्या विकल्या गेल्या. त्यानंतर ग्राहक बांधले गेलेत तर त्यांच्याकडील मुर्ती बघून नवे ग्राहक तयार झाले. यावर्षी या तरूणांनी येथून ट्रक नेला व तेथून २५० मुर्त्या विक्रीसाठी आणल्या. येथील नेहरू चौकात या दोघा तरूणांनी आपले ठाण मांडले होते.
या तरूणांकडे १५० रूपयांपासून ते ५००१ रूपयांपर्यंतची मुर्ती उपलब्ध होती. मात्र गोरेगाव येथील मंडळाने त्यांच्याकडील पाच हजार रूपयांची लालबागच्या राजाची प्रतीकात्मक मुर्ती खरेदी करून नेल्याचे त्यांनी सांगितले. आणलेल्या सर्व मुर्त्या विकल्या गेल्या. आतापर्यंत छत्तीसगडी मूर्त्यांचे आकर्षण असलेल्या गोंदियाकरांना आता पुणेरी मुर्त्या आकर्षीत करीत असल्याचे दिसले.