स्वच्छतेसाठी सरसावली गोंदिया जिल्हा परिषद
By Admin | Updated: October 4, 2014 23:28 IST2014-10-04T23:28:58+5:302014-10-04T23:28:58+5:30
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेची शपथ घेऊन जिल्हा परिषदेतील २३ विभागातील ३३९ कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तास श्रमदान करुन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अभियान राबविले.

स्वच्छतेसाठी सरसावली गोंदिया जिल्हा परिषद
गोंदिया : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेची शपथ घेऊन जिल्हा परिषदेतील २३ विभागातील ३३९ कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तास श्रमदान करुन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अभियान राबविले. कर्मचाऱ्यांच्या या नियोजनबद्ध तथा स्वयंस्फूर्त श्रमदानामुळे जिल्हा परिषद कार्यालय व परिसराचा चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्राला मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी माल्यार्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
दरम्यान, विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पाडवी, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एल. राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, महिला व बालकल्याण विभागाचे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी सचिन साबळे, लघूपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाकोडीकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लोखंडे, कृषी अधिकारी वंदना शिंदे, शिक्षणाधिकारी खंडागळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पेंदाम, जिल्हा आरोग्य अधिकारी हरीश कळमकर आणि वित्त विभागातील अधिकारी उपस्थित होते.
शपथविधिनंतर सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद परिसर व कार्यालयात श्रमदान केले. स्वच्छता अभियानासाठी जिल्हा परिषदेतील ३४९ कर्मचाऱ्यांचे एकूण आठ गट पाडण्यात आले. महिलांनी विशेषत: मुख्य इमारतीत स्वच्छता अभियान राबविले. प्रत्यक्षात मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी स्वच्छता करण्यास सुरुवात केल्यानंतर कर्मचाऱ्यांत चांगलाच उत्साह निर्माण झाला.
प्रत्येक व्यक्ती स्वयंस्फूर्तपणे कार्य करीत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत बघावयास मिळाले. यापुढे खर्रा, गुटखा, तंबाखू व पान खाऊन भिंती रंगविणाऱ्यांना चांगला धडा शिकवणार असल्याचे महिला कर्मचारी बोलू लागल्या. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी अशाप्रकारे स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, असा संकल्प कर्मचाऱ्यांंनी केला. तर काही कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या खिशातील खर्ऱ्याच्या पुड्या कचऱ्यात टाकून यापुढे खर्रा, पान व गुटखा खाणार नसल्याचा संकल्प केला.
सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी कौतूक करुन यापुढे आपले कार्यालय, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातीिल सर्वच शासकीय कार्यालये, रुग्णालय, स्थानिक स्वराज्य संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, नगर परिषद, पोलीस ठाणे तथा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
शासकीय कार्यालयांना स्वच्छ ठेवण्याची शपथ हजारो कर्मचाऱ्यांनी घेतली. दरम्यान या अभियानामुळे समाजापुढे नवा आदर्श निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, वर्षभर धुळीने माखलेल्या फाईलसुद्धा कर्मचाऱ्यांनी साफ केल्या. स्वच्छतेचा संकल्प करून समाजातील घाण सुद्धा दूर करण्याचा या माध्यमातून संदेश देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)