गोंदिया न.प.चे कचऱ्याचे कंटेनर होताहेत भंगार
By Admin | Updated: November 8, 2014 22:40 IST2014-11-08T22:40:48+5:302014-11-08T22:40:48+5:30
कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या वतीने कंटेनर आणि कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. या कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर बरेचदा तो बाहेर न काढता कंटेनरमध्येच

गोंदिया न.प.चे कचऱ्याचे कंटेनर होताहेत भंगार
गोंदिया : कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या वतीने कंटेनर आणि कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. या कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर बरेचदा तो बाहेर न काढता कंटेनरमध्येच आग लावली जाते. या कारणाने शहर परिसरातील सर्वच कंटेनर भंगार झाले आहेत. या आगीत प्लॅस्टिकचा कचराही जळत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून श्वसनाचे आजार वाढले आहेत.
शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी कंटेनर ठेवले आहेत. स्वच्छता कर्मचारीही या कामासाठी नेमले आहेत. काही नागरिक कचरा कंटेनरमध्ये जमा करतात तर अनेक जण कंटेनरच्या बाजूलाच कचरा फेकण्यात धन्यता मानतात. भरलेल्या कंटेनरमधील कचरा बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असतानाही अनेकदा या कंटेनरमध्येच आग लावण्यात येते. हा प्रकार शहरातील बहुतेक ठिकाणी होत असल्याने हे लोखंडी कंटेनर भंगार होत चालले आहे. त्यामुळे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
गोंदिया हे व्यापारी शहर असल्याने येथे प्लास्टिकचा कचरा जास्त निघतो. प्लास्टिकच्या कचऱ्याचे विघटन होत नाही. त्याचबरोबर प्लास्टिक जळाल्यामुळे वायुप्रदूषण मोठयÞा प्रमाणात होते. पर्यावरण तज्ज्ञांचा प्लास्टिक जाळण्यालाही विरोध आहे. कंटेनरच्या चारही बाजुला घरे असतात. अशा स्थितीत आगीचा धूर सभोवतालच्या परिसरामध्ये पसरतो. अनेक वेळा प्रचंड धुरामुळे श्वास घेणेही कठीण होऊन बसते. प्लास्टिकसारख्या घातक पदार्थांच्या जळण्यामुळे निर्माण झालेल्या धुरातून श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नागरिक ही आग आम्ही लावत नसल्याचे गळा ओरडून सांगत प्रशासनाकडे बोट दाखवतात तर परिषदेचे कर्मचारी नागरिकांकडे बोट राखवितात.
त्यामुळे आग लावणारा नेमका कोण, हे कळायला मार्ग नाही.
कंटेनरच्या आसपासच्या घरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असल्याने आग लावणाऱ्यांवर नगर परिषद प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)