पावसानंतर गोंदिया झाला ‘कूल-कूल’, पारा घसरून ३५.५ अंशावर : ढगाळ वातावरणाने दिलासा
By कपिल केकत | Updated: April 23, 2023 19:10 IST2023-04-23T19:10:27+5:302023-04-23T19:10:40+5:30
गुरूवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली व शुक्रवारी वातावरणात गारवा असल्याने ४३ अंशावर गेलेला पार घसरून ४१ अंशावर आला होता.

पावसानंतर गोंदिया झाला ‘कूल-कूल’, पारा घसरून ३५.५ अंशावर : ढगाळ वातावरणाने दिलासा
गोंदिया : शनिवारी सायंकाळी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्हयाचा पार आणखी घसरला असून रविवारी (दि.२३) कमाल तापमान ३५.५ अंशावर आले होते. त्यातही दिवसा पाऊस बरसला नसला तरी ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळाला. मात्र दिवसा उन्ह तापल्याने पावसाची आठवण येत होती.
गुरूवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली व शुक्रवारी वातावरणात गारवा असल्याने ४३ अंशावर गेलेला पार घसरून ४१ अंशावर आला होता.
नंतर पारा आणखी घसरला व शनिवारी तापमान ३९.५ अंश होते. मात्र विदर्भात गोंदिया जिल्हयाचे तापमान सर्वाधिक असल्याने जिल्हाच ‘हॉट’ होता. अशात शनिवारी सायंकाळी अचानकच पावसाने हजेरी लावली व त्यामुळे परत एकदा वातावरणात गारवा निर्माण झाला.
यानंतर रविवारी (दि.२३) जिल्हयाचे तापमान आणखीच घसरले व ३५.५ अंश सेल्सीअसवर आले होते. त्यातही कढी ढग तर कधी उन्ह अशा वातावरणाने दिलासा मिळाला.
चंद्रपूर परत एकदा अग्रस्थानी
- विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक असते व चंद्रपूर जिल्हा अग्रस्थानी असतो. मात्र शनिवारी त्याची जागा गोंदिया जिल्ह्याने घेतली होती. असे असतानाच रविवारी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान वधारून ३८.२ अंशावर गेले व चंद्रपूर जिल्हा परत एकदा सर्वात गरम ठरला. तर नागपूर जिल्ह्याचे तापमान सर्वात कमी ३५.३ अंशावर होते व नागपूर ‘कूल’ तर गोंदिया जिल्हा ‘सेकंड कूल’ होता.
मंगळवारी गारपीटीचा इशारा
- हवामान खात्याने बुधवारपर्यंत (दि.२६) जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. अशात मात्र आता मंगळवारी (दि.२५) गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जिल्हयातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध परिसरात शनिवारीच गारपीट झाली आहे. त्यानंतर आता परत गारपीटीचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.